Chandrashekhar Bawankule: मोदीजी ‘शो’ नाहीत, ते विकासाचा ‘रोड शो’ आहेत; राहुल गांधींच्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींची टीका म्हणजे अहंकार, अपयश आणि नैराश्याचं प्रतीक असल्याची खरमरीत टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : "पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये (Narendra Modi) दम नाही, मीडियानेच त्यांना मोठं केलंय", अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) केलीये. दिल्लीतील ओबीसींच्या भागिदारी न्याय महासंमेलनात ते बोलत होते. मोदी ही काय समस्या नाही, मीडियानेच त्यांना मोठं केलंय, असंही यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींचा हा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केलाय.
दरम्यान, राहुल गांधींच्या या टीकेला आता भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मोदीजी ‘शो’ नाहीत, ते विकासाचा ‘रोड शो’ आहेत. शिवाय जनतेने 10 वेळा काँग्रेसचा ‘हवेचा फुगा’ फोडलाय. राहुल गांधी देश तुमच्या भाषणांवर नाही तर आकडेवारीवर चालतो. राहुल गांधींची टीका म्हणजे अहंकार, अपयश आणि नैराश्याचं प्रतीक असल्याची खरमरीत टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. मंत्री बावनकुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, आदरणीय मोदीजी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदीजी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे. तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘गुब्बारा’ हा शब्द वापरताय पण जनतेने निवडणुकीत 10 वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला आहे.
राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे. केंद्रातील मोदी सरकारने 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे. देशाच्या 140 कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदीजींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचं आणि अपयशाचं जिवंत उदाहरण आहे. अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























