Chandrakant Patil: विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील, भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य!
Maharashtra Politics: लोकसभेच्या निवडणुकीत खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही कारणाने उमेदवारी घोषित करण्यास जो उशीर झाला ते लक्षात घेऊन यावेळी नक्कीच दुरुस्ती होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर: देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार (NDA) स्थापन झाल्यानंतर केंद्रीय स्तरावर भाजपकडून काही फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर एनडीए सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून (BJP) नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याजागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विनोद तावडे हे कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जिथ पाठवू त्याठिकाण यश कसे मिळेल, यादृष्टीने सगळे बारकावे ते पाहतात. 1995 ला चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर ते भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेले, आता ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. आज भाजप पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना काय द्यायचं आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. भाजपमध्ये खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तर ते मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अमित शाहांनी फडणवीसांना थांबायला सांगितलंय, ते पुन्हा कामाला लागलेत: चंद्रकांत पाटील
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या थेट नऊपर्यंत खाली घसरली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. भाजप पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांनी थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 65 हजार झाडं लावणार
चंद्रकांत पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने 65 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क या ठिकाणी चंद्रकांतदादा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर या जिल्ह्यात दादांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड केली जातेय. केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील घेतली गेलीय. दरवर्षी चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमधून साजरा केला जातो. यावर्षी चंद्रकांतदादा यांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने 65 हजार वृक्ष लावले जाणार आहेत.
आणखी वाचा
...तर संजय राऊत भाजपमध्ये आले असते; फडणवीसांचं राजकारण सुडाचं नाही; विनोद तावडे