Buldhana Uddhav Thackeray Rally : चिखलीतील उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात, एक लाख नागरिक सहभागी होण्याचा दावा
Buldhana Uddhav Thackeray Rally : उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली इथे उद्या (26 नोव्हेंबर) दुपारी शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत.
Buldhana Uddhav Thackeray Rally : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बुलढाण्यातील (Buldhana) चिखली इथे उद्या (26 नोव्हेंबर) दुपारी शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या जाहीर सभेत एक लाख नागरिक सामील होतील असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
विदर्भात शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील संजय गायकवाड आणि संजय रायमूलकर हे दोन आमदार तसंच खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता याठिकाणी उद्धव ठाकरे नेमकं बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे भाष्य करणार
चिखली इथल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उद्या दुपारी तीन वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकरी आत्महत्या, खरीप हंगामात अतिवृष्टीने केलेला कहर, शेतकऱ्यांचं नुकसान आणि केंद्र व राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची मिळण्यासाठी होत असलेला उशीर या विषयांवर उद्धव ठाकरे शेतकी संवाद मेळाव्यात भाष्य करणार आहेत.
सभेला सशर्त परवानगी
दरम्यान, चिखलीतील तालुका क्रीडा संकुलातील सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. सभास्थळ असलेल्या क्रीडा संकुलात एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन व्यासपीठच्या अगदी जवळून दुसरे प्रवेशद्वार असणं गरजेचं असल्याचं परवानगीत नमूद केलं आहे. दुसरं प्रवेशद्वार तयार करु असं ना हरकत प्रमाणपत्र द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे, उद्धव ठाकरे आगे बढो' या दोनच घोषणा द्याव्यात, मशाल जाळण्यासाठी स्फोटक-ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, सभेत कोणाच्याही भावना दुखावतील असे फलक लावू नये, कोणत्याही व्यक्ती-जाती धर्माच्या भावना दुखवणारी वक्तव्ये करु नये, वक्त्यांची आणि बाहेरुन येणाऱ्या नेत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि आवाज 50 डेसिबलपेक्षा जास्त नको, या अटींवर पोलिसांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते चिखलीत तळ ठोकून
या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते चिखलीत तळ ठोकून आहेत तर आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे चिखली येथील सभेचा आढावा घेणार आहेत. चिखली येथील सभेच्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून याठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आहे. खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते हे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
VIDEO : Buldhana Shiv Sena Rally : चिखलीत उद्या ठाकरे गटाचा शेतकरी मेळावा, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार