Thane: जनता दरबारात जाऊन तुम्हीच त्यांना रोखा...; मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबार प्रकरणी न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना मिश्किल सल्ला
आमदार गणेश नाईक यांच्या जनता दरबारात महापालिका, सिडकोसह अन्य सरकारी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला केलाय.

Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर शहरांमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईकांनी(Minister Ganesh Naik) घेतलेल्या जनता दरबाराचा मुद्दा आता थेट न्यायालयापर्यंत (Bombay High Court) गेला आहे. मंत्री गणेश नाईक(Ganesh Naik Janata Darbar) यांच्या जनता दरवराविरोधात शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. पालघर जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर शहरांमध्ये जनता दरबार घेऊन इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आल्याचा आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवत असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला. नुकतीच यावर सुनावणी पार पडली.
दरम्यान, भाजप आमदार गणेश नाईक यांच्या जनता दरबारात महापालिका, सिडकोसह अन्य सरकारी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला केलाय. तसेच, मागणीबाबत आश्चर्य व्यक्त करताना याचिकाकर्त्याने स्वतःच या जनता दरबारात उपस्थित राहून तो न भरवण्याची मागणी करण्याचा खोचक सल्ला दिलाय.
Hemant Pawar : गणेश नाईकांचा दरबार म्हणजे दरबारी राजकारण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप वर्चस्व वाढवण्यासाठी जनता दरबार करत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान,शिंदे गटाचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी गणेश नाईकांच्या जनता दरबारावर या पूर्वी सडकून टीका केली होती. गणेश नाईकांचा दरबार म्हणजे दरबारी राजकारण होय. गणेश नाईकांनी त्यांचा जनता दरबार गडचिरोलीमध्ये भरवावा असं हेमंत पवार म्हणाले. गणेश नाईक यांनी जो जनता दरबार भरवला आहे त्यावर माजी खासदार संजीव नाईक यांनी शिंदे साहेबांनी सुद्धा पालघरमध्ये जनता दरबार भरवावा असं सांगितलं. परंतु, नाईक कंपनी ही युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहे.
त्याचं कारण असं की, संजय नाईकांना उमेदवारी मिळाली नाही. संदीप नाईक निवडणुकीत पडले. त्याचा राग मनामध्ये ठेवून हे सर्व उपद्व्याप चाललेले आहेत. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के हे ठाण्यात जनतेची सेवा करण्यास सक्षम आहेत. महाराष्ट्राची जिम्मेदारी शिंदे साहेबांनी घेतलेलीच आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. गणेश नाईकांना माझं सांगणं आहे, हे दरबारी राजकारण त्यांनी गडचिरोलीला जाऊन करावं. गडचिरोलीला जाऊन दरबार भरवावा. असा सल्ला देत या जनता दरबारावर हेमंत पवार यांनी आक्षेप घेतला होता.
आणखी वाचा
























