Unmesh Patil: उन्मेष पाटलांचे शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना, उद्या मातोश्रीवर शिवबंधन बांधणार, जळगावातून उमेदवारी?
Maharashtra Politics: भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुंबई: जळगाव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. मंगळवारी सकाळी उन्मेष पाटील यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे ठाकरे गटात जाणार, अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. कारण, उन्मेष पाटील हे बुधवारी ठाकरे गटात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. बुधवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत उन्मेष पाटील हे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतील, अशी माहिती आहे.
उन्मेष पाटील यांच्या या पक्षप्रवेशासाठी जळगावातून त्यांचे शेकडो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या सकाळी पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्रीवर जातील. शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उन्मेष पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जळगावातून उन्मेष पाटील की करण पवारांना उमेदवारी?
भाजपने लोकसभेचे तिकीट कापल्यापासून उन्मेष पाटील हे नाराज होते.तेव्हापासून ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, भाजपच्या नेत्यांकडून उन्मेष पाटील कुठेही जाणार नाहीत, असा दावा केला जात होता. परंतु, मंगळवारी उन्मेष पाटील यांनी मुंबईत गाठत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. उन्मेष पाटील यांनी आज सकाळपासून ठाकरे गटात जाण्याविषयी स्पष्टपणे काही सांगितले नव्हते. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्मेष पाटील बुधवारी सकाळी 11 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील.
आतापर्यंत शिवसेनेकडून भाजपचे पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार यांना जळगावातून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आता उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास जळगावची उमेदवारी कोणाला मिळणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील विक्रमी मताधिक्याने जळगावातून निवडून आले होते. त्यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता ठाकरे गटात येणार आहे. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
आणखी वाचा
जळगावात ठाकरे गटाची मोठी खेळी, स्मिता वाघ यांच्याविरोधात भाजपच्याच नेत्याला रिंगणात उतरवणार?