Prasad Lad: मनोज जरांगे पाटील बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना जागा दाखवेल, फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाडांचा पलटवार
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका सुरु ठेवली आहे. त्याला भाजपच्या नेत्यांकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी रविवारी मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे यांनी आपली बडबड बंद करावी. अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे लाड यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत. रविवारीदेखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्याविरोधात डाव रचल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत. यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. फडणवीसांमध्ये मराठा द्वेष ठासून भरला आहे. त्यांनी मराठा पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते.
आणखी वाचा
सरकारचा अॅटिट्यूड एका दिवसात बदलला, वार उलटं फिरलं, मनोज जरांगे अडचणीत कसे सापडले?
महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप