Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
माझ्या बाबतीतही बीडसारखच घडविण्याचा कट होता. पण, मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो.

सोलापूर : मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar gore) यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचे गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. मात्र, आपल्याविरोधात काही राजकीय लोकांकडून कट रचला जात असून आपली बदनामी करण्याचा हा घाट असल्याचे मंत्री गोरे यांनी म्हटले होते. त्यानंतर, गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीप्रकरणात अटक करण्यात आली असून याच प्रकरणात आज माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलिसांनी धाड टाकत त्यांचीही चौकशी केली आहे. त्यानंतर, याप्रकणी प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांनी मी आज काही बोलणार नाही. पण, लवकरच पुरावे देईन असे म्हटले होते. आता, बीडप्रमाणेच (beed) माझ्याविरोधात कट रचला जात होता. पण, मला आधीच माहिती मिळाल्याने, मी पुरावे गोळा केले अन् वाचलो, अशी गौप्यस्फोट गोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
माझ्या बाबतीतही बीडसारखच घडविण्याचा कट होता. पण, मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते, असा गंभीर आरोप ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. त्यामध्येस अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. सध्या पोलीस याचा तपास करीत असल्याने मी यावर कोणतेही विधान करणार नसलो तरी पोलिसांची चौकशी झाल्यावर हे सर्व पुरावे आणि माहिती माध्यमांसमोर आणणार असल्याचेही मंत्री गोरे यांनी म्हटले.
माझ्याविरुद्ध कट रचतानाची ऑडिओ क्लिप सुद्धा माझ्याकडे आहे, त्यात बीडची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होता. अगदी एखाद्याला कायमचे संपवायचं आणि त्याचे षडयंत्र माझ्यावर घालायचे, असाही प्रयत्न यात केला गेला होता. यात अनेक मोठी लोकं सामील आहेत, आत्ताही सगळे पुरावे माझ्या मोबाईलमध्ये आहेत. पण सध्या तपास सुरू आहे. त्यामुळे, मी आत्ता काही बोलणार नाही, अशा पद्धतीचा गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी कोणाचेही नाव न घेता केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते व आमदार जयकुमार गोरे यांच्यातील टीका टीपण्णी सर्वश्रुत आहे. त्यामुळे, गोरे यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातील नेत्यांवरच होता, असे दिसून येते.
प्रभाकर देशमुख यांची तीन तास चौकशी
दरम्यान, खंडणीप्रकरणात पुण्यातील कोरेगाव पार्क भागात राहणाऱ्या प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस आज दाखल झाले होते. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सातारा पोलिसांनी प्रभाकर देशमुख यांच्याकडे तीन तास चौकशी केली.
हेही वाचा
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
























