राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्यासाठी चाचपणी, भाजपकडून गुप्त सर्व्हे?
Loksabha Election 2024: दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास काय फायदा होऊ शकतो, त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ना? याची सध्या चाचपणी केली जात आहे. भाजपकडून गुप्त पद्धतीने सर्वेक्षण.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा एकदा विरोधी पक्षांना सुरुंग लावण्याचे काम सुरु केले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पाडल्यानंतर भाजपने आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) या बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष खिळखिळे होणार आहेत. सध्याचा भाजप आणि मित्रपक्षांचा इनकमिंगचा सपाटा पाहता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या बाजूने जोरदार वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. हीच संधी साधून महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार भाजपकडून सुरु असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून राज्यात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक घेणे कितपत फायदेशीर ठरेल, यासाठी गुप्त पद्धतीने सर्वेक्षण सुरु आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास काय फायदा होऊ शकतो, त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ना? याची सध्या चाचपणी केली जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते.
एकत्र निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला फटका
सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. परंतु, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास त्याचा एकत्रित खर्च करणे मविआतील पक्षांना अवघड जाऊ शकते. मात्र, दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास भाजप आणि मित्रपक्षांना मोदी फॅक्टरचा फायदा होऊ शकतो. मात्र, राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीच्या मानसिकतेने मतदान केल्यास भाजपला फटका बसू शकतो. त्यामुळे आधी मोदींच्या नावावर लोकसभा जिंकून नंतर स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये फूट पडणार?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून बडे नेते आयात करण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजप आणि मित्रपक्षांमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी वाचा