BJP Booster Sabha: मविआला फडणवीस देणार 'बूस्टर' डोस, आज मुंबईत होणार सभा
Devendra Fadnavis: आज मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुस्टर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Devendra Fadnavis: आज मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुस्टर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत फडणवीसांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाचा समारोप होणार आहे. तसेच या सभेत देवेंद्र फडणवीस हे पालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेला लक्ष्य करू शकतात. भाजपने या सभेची जोरदार तयारी केली आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेत फडणवीस कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेत भाजप-मनसे युतीबद्दल फडणवीस काही संकेत देऊ शकतात का, हे देखील पाहावं लागणार आहे.
या सभास्थळी असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ''आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र काहींना बाळासाहेब ठाकरे हे देखील लहान वाटायला लागले आहेत. ते स्वतःला सर्वात मोठे आणि सर्वज्ञानी समजत आहेत. म्हणून त्यांना कशाचीच गरज वाटत नाही.'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधार भोंगे आणि डोंगे करण्याची गरज नाही, अशी टीका केली आहे. यावर बोलता ते म्हणाले, ''कोट्या करण्यात तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अशोक नायगावकर आणि रामदास फुटाणे यांनाही मागे टाकतील, अशा कोट्या अलीकडच्या काळात ते करताना दिसत आहेत. मला वाटत इतक्या मोठ्या नेत्याने विषयावर भाष्य केलं पाहिजे. काव्य करून लोकांचं मनोरंजन करणं त्या पदाला शोभा देणारं नाही.''
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात आपली मते मांडली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची सोमय्या ग्राऊंडवर सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. तर औरंगाबादमध्ये बहुचर्चित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज ठाकरे यांची ही सभा ऐतिहासिक असणार, असं मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. या दोन्ही सभांवर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.