BJP Vs Congress: काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करुन टाका! भाजपची आक्रमक रणनीती, चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
BJP Maharashtra: बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्याचा आदेश दिला. काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार असं आश्वासन दिले.

Pune BJP meeting: आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षात गेल्या दोन वर्षात उभी फूट पडली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसला (Congress) फोडा आणि पक्ष रिकामा करा, असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांनी बोलताना हे वक्तव्य केले आहे. पुण्यात (Pune news) भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
अलीकडेच भोरचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर भाजपची नजर आहे हा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. पक्षफोडीच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार असं बावनकुळे म्हणाले. तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा नसल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.
मंत्रालयात या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तेचा फायदा करुन घ्यावा: बावनकुळे
19 मंत्र्यांना आम्ही आता प्रदेशासाठी पीए देतोय. जेणेकरुन तुम्ही कोणीही मंत्रालयात आले तरी तुमची गैरसोय होता कामा नये, याची काळजी घेऊ. भाजपचा एक कार्यकर्ता पूर्णवेळ तुमच्यासाठी बसेल. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम करुन देईल. संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मंत्रालय आपलं वाटलं पाहिजे, आपलं सरकार, आपला मंत्री वाटला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना वाटते, मंत्रालयात जाऊन काय बोलू. काँग्रेसवाल्यांना सत्तेचा फायदा करुन घेता येतो, भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा करुन घेता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपण सरकारकडून काम करुन घेतलं पाहिजे. कोणीही निराश होऊ नका. प्रचंड ताकदीने काम करा.
भाजपकडे मोदी-फडणवीसांसारखे नेतृत्त्व असलं तरी निवडणूक जिंकायला त्यांना काँग्रेसचे नेतेच लागतात: हर्षवर्धन सपकाळ
भाजप पक्ष हा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. त्यांना माहिती आहे की, त्यांच्याकडे जरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेतृत्व सांगणारी जोडी असली तरी निवडणूक ही काँग्रेसच्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात. त्यामुळे ते विरोधकांना फोडण्याचा षडयंत्र रचत आहेत. ज्याचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ते परभणीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
आणखी वाचा





















