Beed: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच पंकजा मुंडेंनी त्यावर भाष्य केलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज नववा स्मृतिदिन असल्याने त्यानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व चर्चांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं दिसून आलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) देखील गोपीनाथ गडावर दाखल झाले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर पंकजा मुंडेंनी मी भाजप पक्षाची आहे, पण पक्ष माझा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
'वेगळी भूमिका घ्यायची असल्यास सर्वांसमोर घेईल'
पंकजा मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधताना सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मला जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर पंकजा मुडे अशीच तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुमच्यासमोर बिनधास्त भूमिका घेईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोक भूमिका घेईल, असंही पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या.
'कुणाला खांद्यावर बंदुका ठेऊ देणार नाही'
कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी काम करणार नाही आणि बंदूक चालवण्याएवढे खांदे देखील मला अजून तरी मिळाले नाहीत, असं त्या म्हणाल्या. मात्र, माझ्या खांद्याची रूंदी इतकी आहे की, माझ्या खांद्यावर अनेक जण बंदूक ठेवतात आणि आता त्या बंदुका देखील मी त्यांना ठेऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
'कधी कुणासमोर झुकणार नाही'
पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या वाक्याचं स्मरण करुन दिलं आणि त्याच मार्गावर चालत असल्याचं त्या म्हणाल्या. मी माझ्या लोकांसाठी लढणार, मी थांबणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, हेच माझं आचरण आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. कुणाला धमकावण्यासाठी, इशारा करण्याची गरज नसते. ज्याला इशारा करायचा असतो तिथपर्यंत ते जात असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्या नेत्याची भेट घेणार
अमित शाह माझे नेते आहेत आणि मी त्यांची भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्यासोबत सर्व विषयांवर बोलणार असल्याचं त्या म्हणाल्या. रडगाणे गाणारे मी नाही, मी कुणापुढे पदर पसरणार नाही, हे सर्व माझ्या लोकांसाठी करणार आहे, असं त्या म्हणाल्या. मला कुणाकडून काही अपेक्षा नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पक्ष काढण्याची कार्यकर्त्यांची मागणी
भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज आहेत, अशा चर्चा अनेक वेळा झाल्या. मात्र पंकजा मुंडेंनी गरज पडेल तेव्हा माध्यमांसमोर भूमिका मांडेल, असं स्पष्टपणे जाहीर केलं. त्यामुळे कोणीही माझ्या बातमीच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह देऊन बातमी करू नये, असंही त्या म्हणाल्या. ज्यावेळी पंकजा मुंडे पक्षासंदर्भातील आपली भूमिका मांडत होत्या, त्यावेळेस एक कार्यकर्ता उठून म्हणाला की, ताई तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने पक्ष काढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
हेही वाचा: