Gopinath Munde Death Anniversary :  भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज नववा स्मृतिदिन (Death Anniversary) आहे. बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतो. आज सुद्धा सकाळी कीर्तन, त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि त्यासोबतच आरोग्य शिबिर असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.


दरम्यान दुपारी दोन वाजल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) गोपीनाथ गडावर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. आज गडावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भाषण करतील. मागील दोन-तीन दिवसांमध्ये या दोन्ही बहिणीचे पक्षासंदर्भात काही वक्तव्ये समोर आली होती आणि त्यावर इतर राजकीय पक्षांनी भूमिका व्यक्त केल्या होत्या. त्यावर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे काय बोलणार याकडे साऱ्यांच्या नजर लागल्या आहेत.


काय होती पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची वक्तव्ये?


दिल्लीत बुधवारी झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, "मला लोक म्हणतात पक्ष माझा. मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे. आम्हाला काही नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला." तर दिल्लीतील पैलवानांच्या आंदोलनावरुन खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. "महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विषयात त्यांच्याशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका प्रीतम मुंडे यांनी घेतली होती.


फोटोतून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा


गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी दुर्मिळ फोटो लावण्यात आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वाटचालीची आठवण यातून जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्यासह लालकृष्ण अडवाणी या राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोतून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला उजाळा दिला जात आहे.


गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन


भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 रोजी निधन झालं होतं. दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते प्रचंड मतांनी विजयी झाले. केंद्रात मोदींचं सरकार आलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्रात परतणार होते. त्यासाठी 3 जून रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.