NCP OBC Cell Convention : व्यापारांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपने प्रयत्न करुन इतर सर्व समाज घटकांमध्ये आपले पाय रोवले. खास करुन ओबीसी समाजातील विविध जातींना स्वतःसोबत जोडल्यामुळे भाजप देशासह महाराष्ट्रातही सत्तेत आला. तर फक्त मराठ्यांचा पक्ष अशी आजवरची प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही (NCP) विस्तारासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन विदर्भात (Vidarbha)ठेवून राष्ट्रवादीने ओबीसी मतदारांच्या (OBC Voters) माध्यमातून पक्ष विदर्भात आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले आहे.
प्रत्येक पक्षाला तयारी करावी लागते, कार्यकर्त्यांना अलर्ट ठेवावे लागते, ओबीसी शिबिराच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसमोर ओबीसीचे विविध मुद्दे मांडू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी मतांसाठी विदर्भातूनच का प्रयत्न करत आहे हे समजून घेणंही आवश्यक आहे.
- विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघापैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघात ओबीसी मतदार निर्णायक.
- या 32 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढाई
- या 32 मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप ओबीसी उमेदवारच उतरवतात
- विदर्भात काँग्रेस आणि भाजपच्या तुलनेत बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धेतही नाही.
- ओबीसी मतांमध्ये घुसखोरी केल्याशिवाय विदर्भात पाय रोवणे कठीण असल्याचे नेतृत्वाला कळले आहे
भाजपची राष्ट्रवादीवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात ओबीसी मतांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसताच भाजपनेही राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना नौटंकी संबोधन आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असताना ओबीसी आरक्षणासाठी काहीही न करणारे अजित पवार, ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेले इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक निधीची फाईल दाबून ठेवणारे अजित पवार, आता ओबीसींसाठी मेळावे घेत असल्याच्या प्रयत्नांची भाजपने खिल्ली उडवली आहे.
'या' गोष्टीची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती
दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात ओबीसी मतांचं महत्व ओळखून त्यासाठी प्रयत्न सुरु करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर आणखी एक मोठी अडचण म्हणजे मराठा समाजाच्याया आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न. मराठा समाजाला विद्यमान घटनात्मक तरतुदीतून आरक्षण देणे कठीण आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक संघटनांनी मराठा समाजाला ओबीसी समाजासाठी असलेल्या 27 टक्क्याच्या कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे केली आहे. हीच मागणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी इकडे तिकडे विहीर अशी अवस्था आहे. कारण मराठा मतांसाठी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी भूमिका घेतली तर ओबीसी समाजाची नाराजी ओढावू शकते आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या आरक्षणासाठी काही केलं नाही तर आजवर हक्काची व्होट बँक मानला जाणारा मराठा समाज राष्ट्रवादीपासून दूर होऊ शकतो, अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.
नागपुरात दोन दिवसांच्या ओबीसी सेलच्या शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय मंथन करतात आणि ओबीसी समाजा संदर्भात पुढचं काय धोरण निश्चित करतात, हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. असे असले तरी ओबीसी व्होट बँकेत भाजप आणि काँग्रेससारखे कडवे प्रतिस्पर्धी असताना राष्ट्रवादी काँग्रेससाठी ओबीसी मतांची लढाई सोपी नाही हे निश्चित.
VIDEO : Nagpur NCP OBC Cell : नागपुरात आजपासून राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचं शिबीर