Sanjay Raut: ब्राह्मण मुख्यमंत्री केल्याने टीका, पण बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवला: संजय राऊत
Manohar Joshi Passed Away: मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या माटुंगा परिसरातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक काळाच्या पडद्याआड
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी शुक्रवारी पहाटे निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, शुक्रवारी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्षात काम केले होते. बाळासाहेबांच्या खास मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोकाकूल प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
ब्राह्मण मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेवर टीका पण बाळासाहेबांचा मनोहर जोशींवर विश्वास
मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले तेव्हा एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री केल्याबद्दल शिवसेनेवर टीका करण्यात आली. पण बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही. त्यांना मनोहर जोशी यांच्या कर्तबगारीवर विश्वास होता. मनोहर जोशी यांनी आपले कर्तव्य पार पाडत बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला. जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण केले, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचा झुंजार लढवय्या नेता: संजय राऊत
शिवसेनेच्या वर्तुळात मनोहर जोशी यांना प्रेमाने पंत म्हणायचे. शिवसेनेसाठी ते आदर्श व्यक्तीमत्त्व होते. ते एक झुंजार आणि लढवय्ये नेते होते. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असायचे. सीमाप्रश्नी जे आंदोलन झाले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती. तेव्हादेखील मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, लोकसभा खासदार आणि लोकसभा अध्यक्ष अशा जवळपास सर्व संसदीय पदांवर काम केले. यासाठी ते कायम शिवसेनेचे ऋणी राहिले. मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राजकारणात वेळ कशी पाळायची, हे मनोहर जोशींनी दाखवून दिलं: संजय राऊत
मनोहर जोशी हे एक हाडाचे शिक्षक होते. ते उत्तम वक्ते होते. त्यांनी संसदचे कामकाज पक्षपात न करता कसे चालवावे, याचा उत्तम वस्तुपाठ घालून दिला होता. मी त्यांच्यासोबत अनेक दौरे केले. वक्तशीरपणा हा त्यांच्यातील एक घेण्याजोगा गुण होता. ते दिलेली वेळ नेहमी पाळत असत. राजकारणात राहून दिलेली वेळ कशी पाळायची असते, हे मनोहर जोशींनी दाखवून दिले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना काश्मिरी पंडितांना इंजिनिअरिंग ते अन्य शैक्षणिक विभागांमध्ये राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही राऊत यांनी सांगितले.
आणखी वाचा
मातोश्रीवरुन बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश अन् मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला