Ashok Chavan: मला कोणी जा म्हणून सांगितले नाही, अडखळलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण भरभरुन बोलले
Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाण आणि अमर राजुरकरांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपमध्ये येण्याचा वैयक्तिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan Joins BJP) यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे मला कोणी जा असे सांगितले नाही. आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले असून पुढेही भाजपच्या (BJP) माध्यमातून करेल. आज पुन्हा एकदा नव्या राजकीय आयष्याची नवी सुरुवात करत आहे.भाजप देईल ते काम करायला मी तयार आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, विरोधात आणि सत्तेत असताना देखील फडणवीसांचे आणि आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीसांनी नेहमी आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात आगामी निवडणुकीत भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे.
पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले, पक्षाने मला खूप काही दिले आहे. हे पण तेवढच खरे आहे की मी पक्षासाठी भरपूर काम केले आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पक्ष वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे पक्षाने मला भरपूर दिले तरी पक्ष सोडला अशी टीका करणे योग्य नाही .पक्षाला कशी ताकत मिळेल यासाठी प्रयत्न करेल. कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही.
पक्ष का सोडला, योग्य वेळ आल्यावर बोलेल : अशोक चव्हाण
मी वैयक्तिक टीका कुणावर करणार नाही. मी कोणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे पार पाडली आहे. पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. पक्षाकडून जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेल, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कुणी जा असे सांगितले नाही
मी अधिक भाष्य करणार नाही. योग्य वेळी आल्यावर बोलेल, असे देखील अशोक चव्हाण या वेळी म्हणाले.
हे ही वाचा :
Ashok Chavan: बावनकुळेंनी फॉर्मवर सही केली अन् अशोक चव्हाण भाजपवासी झाले, कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा