Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Maratha Reservation: अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाने नांदेडची जबाबदारी दिली असून नांदेडचा खासदार विजयी करण्यासाठी चव्हाण मतदारसंघात फिरत आहेत.
Maratha Reservation नांदेड : काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मराठा समजााच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून मराठा समाज (Maratha Reservation) बांधव त्यांच्याकडे आरक्षणाच्या मुद्दयावरुन जाब विचारत आहेत. राज्यात आणि केंद्रात सध्या भाजपाप्रणित आघाडीची सत्ता आहे. त्यातच,भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. त्यामुळे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी समाज बांधवांकडून अशोक चव्हाणांना पोटतिडकीने जाब विचारला जात आहे. लोकसभा निवडणुकांसाठी ते सध्या गावदौर आणि प्रचार सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचं आवाहन करत आहेत. त्यावर, समाजाच्या भावना तीव्र होतानाचे दिसून येते.
अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाने नांदेडची जबाबदारी दिली असून नांदेडचा खासदार विजयी करण्यासाठी चव्हाण मतदारसंघात फिरत आहेत. मात्र, यापूर्वीच मराठा समाज बांधवांनी अशोक चव्हाण यांची गाडी अडवल्याचं सर्वांना पाहिलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांच्यावर मराठा समाजाच्या रोषाची नामुष्की ओढावली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभांचं आयोजन केलं जात आहे. मुखेड तालु्क्यातील जांब येथे गुरुवारी रात्रीमहायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. या मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत, मराठा आरक्षणांसदर्भात चव्हाण यांना जाब विचारला. त्यामुळे, काही वेळेसाठी खासदार महोदयांना आपली सभा थांबवावी लागली होती.
मराठा समाज बांधवांची घोषणाबाजी
मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का?, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे प्रश्न करत मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. यावेळी, अशोक चव्हाण यांनी काही वेळ आपली सभा थांबवून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर, आपली सभा पुन्हा सुरू केली. मात्र, भाजपा नेत्यांना, त्यातच भाजपातील मराठा समाजाच्या नेत्यांना, आमदार-खासदारांना सातत्याने मराठा समाज बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनीही ट्विट करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.
जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे आज महायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती मी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण… pic.twitter.com/dW7moc0Gy5
— Ashok Chavan (@AshokChavan1958) April 18, 2024
अशोक चव्हाणाचं ट्विट
जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे आज महायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले.त्यांचे निवेदन मी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती मी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण थांबवून मी त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर ते निघून गेले व सभा पुन्हा सुरू झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि राजकीय विषयावर चर्चा केल्याची माहिती आहे.