Ashish Shelar : पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या अन् इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायेत; मनसेच्या मराठी भाषा आंदोलनावर नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
Ashish Shelar : सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनाची तुलना थेट पहलगामच्या हल्ल्याशी केली आहे.

Ashish Shelar : मीरा रोड येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातवरण चांगलच तापले आहे. तर याच मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात जे मराठीचा अपमान करतील त्यांना धडा शिकवाच. पण हे करताना व्हिडीओ बनवू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनाची तुलना थेट पहलगामच्या हल्ल्याशी (Pahalgam Terror Attack) केली आहे.
नेमकं काय आशिष शेलार?
आशिष शेलार म्हणाले की, मला तर या सगळ्या गोष्टीची उद्विग्नता येते. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायेत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणाऱ्या आहेत. व्हिडिओ काढा, नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळत आहे, तो अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. सरकारने तर कडक पावले उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत. मोठा पक्ष आहोत. मोठा भाऊ आहोत. मोठी जबाबदारी आहे. म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडत आहोत. पण, हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले.
आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका
आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर देखील हल्लाबोल केलाय. दोन भाऊ एकत्र आले, खूप छान झाले. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे. कारण, हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्थेमध्ये कुटुंबाचे महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचेच तर एकाचे भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका त्यांनी केली.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात. ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात. ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात. कोणीही द्वेषाची भावना पसरवू नये आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपानेच केली आणि भाजपाच करेल. अमराठी माणसाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये पण म्हणून कुठेही घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























