निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट केलं गेलं; तटकरेंनी सगळंच सांगितलं, जयंत पाटलांवरही बोलले
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता राज्यसभेच्या (Rajyasabha) निवडणुकांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेच्या जागांबाबत माहिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या एनडीएमधील सहभागावरुन तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र, आम्ही एनडीएसोबतच असून पुढील काळात आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे. सध्या आमचे दोन खासदार आहेत. एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत असून पुढील काळात आणखी दोन खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार आहेत. त्यामुळे, राज्यसभेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव निश्चित होते, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र, आम्ही आमचा उमेदवार उद्या सकाळी जाहीर करू, तो मीच करेन, असे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हटले. तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. निवडणूक जवळ येताच, अजित पवारांना टार्गेट करण्यात आल्याचं तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची कारणमिमांसा केली. या निवडणुकीत जे काही अनुभवलं त्याचा विचार आम्ही करणार आहोत. काही लोक आमच्या आमदारांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, तसं काहीही नाही. आम्ही लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून अर्थसंकल्प संपल्यानंतर अजित पवार यांचा ही राज्यव्यापी दौरा होणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. मतदानाची तारीख जवळ येत गेली, तसं अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलं, जाणीवपूर्वक त्यांना सोशल मीडियातून लक्ष्य केलं गेलं, असे म्हणत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांवर निशाणा साधला.
हे शीतयुद्ध नाही, उघड-उघड वाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यातील भाषणावरुन जयंत पाटील व पक्षातील काही नेत्यांमध्ये वाद असल्याचे तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीत हे शीतयुद्ध नसून हे उघडउघड दिसत असल्याचंही ते म्हणाले. काल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषेत सत्य सांगितलं, बोलण्याच्या ओघात ते सत्य बोलून गेले. जयंत पाटील हे सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना काल सांगावं लागलं की मी आता सहा महिने अध्यक्ष आहे, तोपर्यंत काही बोलू नका, याचा अर्थ काय? असा सवाल सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला. तसेच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचंही म्हटलं.
राज्यसभेचा उमेदवार उद्या जाहीर होणार
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी सध्या पार्थ पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून थेट त्यांना राज्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभेसाठी उमेदवारी भरण्यासाठी गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. आता, शेवटच्या दिवशीच उमेदवाराची घोषणा होणार असून त्याच दिवशी अर्जही भरला जाईल.
सुनिल तटकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- आम्ही लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे
- लोकसभा संदर्भात सर्व ज करून घेण्याचा प्रयन्त केला
- 19, 20 आणखी 21 रोजी माझा दौरा असणार आहे
- अहमदनगरमधून आम्ही हा दौर करणार आहे
- संघटनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे
- प्रत्येक निवडणुकीची समिकरणं वेगळी असतात
- त्यानंतर विधानसभेला वेगळं असतं
- महायुतीला अपेक्षित यश या निवडणुकीला मिळालं नाही
- काही वर्ग आमच्यापासून दुरावला आहे
- त्यामुळे अपेक्षित यश मिळालं नाही.
- या निवडणुकीत जे काही अनुभवलं त्याचा विचार करणार आहे.
- काही लोक आमच्या आमदारांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत
- अर्थसंकल्प संपल्यानंतर अजित पवार यांचा ही राज्यव्यापी दौरा होणार आहे
- मतदानाची तारीख जवळ येत गेली, तसं अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलं
- आमदारांची बैठक झाली त्यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. मात्र, काही आमदार घरी होते कारण त्यांची अडचण होती.
- काल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषेत सत्य सांगितलं
- बोलण्याच्या ओघात ते सत्य बोलून गेले.
- जयंत पाटील हे सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत.
- त्यांना काल सांगावं लागलं की मी सहा महिने अध्यक्ष आहे, तोपर्यंत काही बोलू नका
- याचा अर्थ काय, असे म्हणत सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे स्पष्ट केले.