(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab VIDEO : ईडी चौकशीला जाताना वायकर ढसाढसा रडत होते, आता समजेल खरी शिवसेना कुणाची: अनिल परबांचं शिंदेंसह भाजपला आव्हान
Anil Parab On BJP : ज्या रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच लोक आता महायुतीचे उमेदवार आहेत, हे भाजपला मान्य आहे का असा सवाल अनिल परब यांनी विचारला.
मुंबई : रवींद्र वायकर (Ravindra Waikar) शिवसेनेत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता शिंदे गटात गेल्यावर त्यांना महायुतीचा उमेदवार बनवण्यात आलं, भाजपला हा भ्रष्टाचार मान्य आहे का? भ्रष्टाचार हे मेरिट आहे का? असे सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केले. ईडी चौकशीला जाताना हा माणूस रडत होता, आता निवडणुकीत समजेल खरी शिवसेना कुणाची असाही टोला अनिल परब यांनी लगावला.
अनिल परब म्हणाले की, शिवसैनिक वाट पाहत होता रवींद्र वायकर यांना कधी उमेदवारी मिळते. अमोल कीर्तिकर नवखा नाही, मागील 10 वर्षांपासून त्यांच्या वडिलांचं काम करतोय. अमोल एकटा नाही, मी आहे, सुनील प्रभू आहेत आणि इतर नेतेसुद्धा सोबत आहेत. ईडी चौकशीला सामोरे जाताना हा माणूस ढसाढसा रडत होता. आता ते म्हणत असतील त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना.आता निवडणुकीत त्यांना कळेल खरी शिवसेना कोणाची.
भ्रष्टाचार हे भाजपसाठी मेरिट आहे का?
यामिनी जाधव, वायकर, सुनेत्रा पवार, शेवाळे या सगळ्यावर भाजपने आरोप केले होते, आता त्यांना उमेदवारी दिली असं सांगत अनिल परब म्हणाले की, महायुतीने आपले मुंबईतले उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे गटाला उमेदवार जाहीर करावे लागले. ज्या उमेदवारांवरवसेनेत असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले होते, ते जेलमध्ये जातील, अशा वलग्ना ते करत होते. सोमय्या म्हणतात भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. हा भ्रष्टाचार भाजपला मान्य आहे का? या उमेदवारांचा भ्रष्टाचार हे मेरिट आहे का?
वायकर, यामिनी जाधवांच्या प्रचाराला किरीट सोमय्यांनी उतरावं
भाजपला मी मागणी करतो विनंती करतो की रवींद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.
किरीट सोमय्या म्हणतात की, या लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा होता, त्यांच्या आदेशाने मी आरोप केले. त्यामुळे मुंबई पुरतं का होईना किरीट सोमय्या यांना या उमेदवारांच्या प्रचाराला उतरावं असं अनिल परब म्हणाले.
वायकर सरेंडर झाल्यावर महापालिका काय करते ते पाहावं लागेल
अनिल परब म्हणाले की, वायकरांची याचिका मी हाताळली आहे. उच्च न्यायालयात वायकर हरले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केस गेली. त्यात मुंबई महापलिका म्हणते आम्ही या प्रकरणावर पुनविचार करू. वायकर सरेंडर झाल्यावर आता महापलिका काय करते हे बघावं लागेल.
किरीट सोमय्या यांनी किती आरोप केले, किती पत्रकार परिषद वायकरांवर आरोप करताना घेतल्या? भाजपला हे मान्य आहे का? ते आरोप आम्ही केले नाही भाजपने केले आहेत. आता यांचा प्रचार भाजप कार्यकर्ते करताना पाहायला मिळणार का? असा सवाल अनिल परब यांनी विचारला.
हेमंत गोडसेंना फायदा होणार नाही
अनिल परब म्हणाले की, हेमंत गोडसे यांना नाशिकमध्ये कुठेही फायदा होणार नाही. सगळ्यांनी ती जागा आपली आहे असा आग्रह केला होता . त्याचा फटका गोडसे यांना बसेल. प्रत्येकाला आपला उमेदवार नाशिकमध्ये द्यायचा होता.
ठाणे मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपकडून सेनेसाठी खेचून आणला होता. बाळासाहेब म्हणाले होते मैत्रीपूर्ण लढत करू, ताकद बघू. आता ही जागा सेनेकडे ठेवायला शिंदेना फेस आला असा टोला अनिल परब यानी लगावला.
ही बातमी वाचा: