Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
Amol Mitkari on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.

Amol Mitkari on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) संवादात चांगले नाहीत असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नाराज व्यक्त केली आहे. संवादासंदर्भातील गोष्टी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते, असं मिटकरी म्हणाले आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे आहेत की, मुख्यमंत्र्यांचाच आमच्यासोबतचा संवाद कमी आहे? हे शोधावं लागणार आहे. तसेच, असं मत व्यक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं टाइमिंग नक्कीच चुकलं असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी खुश होण्याचा कारण नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'इंडियन एक्सप्रेस ग्रुप'च्या 'एक्सप्रेस अड्डा' या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवून दिली. तसेच, अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असे देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक देखील केले.
मिटकरींचा संजय राऊतांना टोला
दरम्यान, भुजबळ यांच्या मंत्रीपदासाठी दिल्लीतून दबाव असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांवर आमदार मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत पुस्तक लिहिल्यानंतर आजही स्वर्गात असल्यासारखंच बोलतायेत. पुस्तकाच्या खपासाठी संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप आमदार मिटकरींनी केलाय. संजय राऊत यांच्या वक्तव्यांना कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचा टोलाही यावेळी आमदार मिटकरी यांनी लगावलाय.
आणखी वाचा























