UP Politics : उत्तर प्रदेशमध्ये 25 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले आणि आता 26 मार्च रोजी समाजवादी पक्षाने राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची निवड केली आहे. शनिवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 


यूपीमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनीही आपली रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाची पहिली बैठक झाली. या बैठकीत सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी पक्षाच्या या निर्णयाची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अखिलेश यादव यांची सपा विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. 


माध्यमांशी बोलताना नरेश उत्तम पटेल म्हणाले की, अखिलेश यादव यांनी 28 मार्च रोजी आमच्या मित्रपक्षांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदारांना आमंत्रित केले आहे. ते त्याच दिवशी येतील. त्या दिवशी सभागृहाच्या कामकाजावर सर्वांशी चर्चा केली जाईल. सभागृहात जनतेचे प्रश्न कसे मांडले जातील यावरही चर्चा होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये योगी सरकारचा शपथविधी पार पडला. ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी 52 मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


हेही वाचा :