मोठी बातमी: शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून 7 जणांना संपर्क
Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
खासदारांना दिली ऑफर?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. तर शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्या जबाबदारीचा भाग म्हणून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदारांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली. तुम्ही सत्तेसोबत या असं सुनील तटकरे यांनी या सात खासदारांना सांगितलं. या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीबाबतची आणि ऑफर बाबतची माहिती तुम्ही कोणाला देऊ नका असेही तटकरेंनी खासदारांना म्हटलं असल्याचं बोललं जातंय. मात्र या सातही खासदारांनी या भेटीची माहिती शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना दिली त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करून याबाबतची नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का अशी विचारना सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे. या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांचे ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
याबाबात शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही, असं निलेश लंके म्हणाले. राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं. घाबरुन निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची अन् सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असं निलेश लंके म्हणाले. कुणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा झालेली नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत', असं निलेश लंके म्हणाले.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
याबाबात अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असं मिटकरी म्हणाले. सात- आठ खासदार येण्यासाठी इच्छूक असतील तर त्याचं स्वागत करतो. निलेश लंके तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. पक्ष जर मजबूत होत असेल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. पक्ष मजबूत झाला पाहिजे, असं अमोल मिटकरींनी सांगितलं. दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या गुलदस्त्यात आहे. ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं मिटकरींनी म्हटलं.