Ajit Pawar : रायगडला पालकमंत्री कधी मिळणार? अजित पवार यांचं थेट उत्तर म्हणाले, लवकरच...
Ajit Pawar : रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. ते रायगड दौऱ्यावर असताना बोलत होते.

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये विविध मुद्यांवर भाष्य केलं. अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, रायगडच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केलं राष्ट्रवादी आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर तयारी करते का? असं विचारलं असता अजित पवार यांनी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करतो आहे. निवडणुका जवळ आल्या की त्याबद्दल योग्य निर्णय होईल. मागे आघाडीत काम करत असताना काँग्रेससोबत काम केलं, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निर्णय आम्ही जिल्हा वाईज सोडत होतो. एखाद्या ठिकाणी एक पक्ष मजबूत असतो, तर दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा पक्ष मजबूत असतो. कारण प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि तशीच परिस्थिती आज राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आहे, असं अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले. परंतु, अशी चर्चा होत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तयारी करणे गरजेचे आहे. निवडणुका कुठल्याही असू दे त्या कार्यकर्त्याने त्यावेळी तत्पर असणे गरजेचे आहे आणि हीच तत्परता माझ्या कार्यकर्त्यांनी दाखवावी हेच आव्हान आम्ही त्यांना केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निर्णय त्या त्या जिल्हा पातळीवर होतील. मुंबईबाबतचा निर्णय आम्ही बसून घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
रायगडला पालकमंत्री कधी मिळेल?
रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद लवकरच मिळेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. आता हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही अडचण गोष्ट थांबविलेली नाही, असंही अजित पवार यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातील विकासासाठी कोणताही निधी थांबविलेला नाही. रायगड जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करून रायगड जिल्ह्याला सुद्धा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आणि बाकीचे काम अधिक गतीने करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील प्रश्नांबाबत अजित पवार काय म्हणाले?
राज्यात वेगवेगळ्या भागात अनेक प्रश्न निर्माण होत असतात त्यामधील काही प्रश्न सरकारमार्फत सोडविले जातात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्नेहल जगतापनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आदिती तटकरे देखील आम्हाला नेहमी आम्हाला सांगत असते. आमचं महायुतीचे सरकार आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतो. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या परीनं सोडवण्याचं काम करतात. मात्र, सामुदायिक जे निर्णय असतात ते आम्ही एकत्र बसून घेत असतो, असं अजित पवार म्हणाले.























