दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
संजय देशमुख हे गेल्या पंधरा वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मुंबई: माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय 55 वर्षे) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या कार्यकाळात गेल्याच आठवड्यात ते विधिमंडळात (assembly) सक्रीयपणे सहभागी होते. या काळात अनेक नेत्यांच्या व पत्रकारांच्या त्यांच्याशी गाठीभेटीही झाल्या आहेत. त्यामुळे, अनेकांना त्यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवारांनीही ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संजय देशमुख हे गेल्या पंधरा वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या संयमित आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मुंबई दिनांक आणि दैनिक सकाळ या माध्यम समूहातून केली होती. माध्यमांतील अनुभवामुळेच त्यांच्या शासकीय जनसंपर्क कार्यात व्यावसायिकता आणि सुसूत्रता होती. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी व मुलगी असा परिवार आहे. सोमवार 14 जुलै रोजी सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, संजय देशमुख यांचे हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवार सकाळी 07 ते 08 या वेळेत वरळी पोलीस स्टेशनशेजारील 'दर्शना' या शासकीय निवासस्थानी ठेवण्यात येईल, त्यानंतर सकाळी 08.30 वाजता दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजित पवारांकडून श्रद्धांजली
मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं. त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
मित्राने जागवली दोन दिवसांपूर्वीची आठवण
''तुमचे जुने सगळे कपडे आता फेकून दिले असतील ना?, त्यांच्या वाढत्या वजनावर अप्रत्यक्ष टोमणा मारत मी विचारणा केल्यावर त्यांचे उत्तर 'नाही रे, सगळे ठेवले आहेत, वेट कमी झाल्यावर परत वापरायचेत,' जेष्ठ मित्रवर्य आणि माहिती व जनसंपर्क संचालनालयातील वरिष्ट सहाय्यक संचालक संजय देशमुख यांच्याशी गेल्या गुरुवारी दुपारी विधानभवनातील डीसीएमच्या खासगी सचिवाच्या ऑफिसमध्ये त्यांच्याशी झालेला हा संवाद. आणि आज सकाळी त्यांचा हदयविकाराने निधन झाल्याचा मेसेज पहिल्यानंतर मोठा धक्काच बसला'', अशी आठवण सांगत पत्रकार जमीर काझी यांनी फेसबुकवरुन संजय देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
























