Jayant Patil: अजितदादा महायुतीत काही मागण्याच्या पोझिशनमध्ये नाहीत, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर जयंत पाटलांची खोचक टिप्पणी
Jayant Patil on Ajit Pawar CM Post: अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची बातमी ‘द हिंदू’ दिली आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांची मोठी तयारी सुरू आहे, बैठका, गाठी-भेटी, चर्चा, दौरे, मतदारसंघावरील दावे यांना वेग आला आहे. अशातच राज्यातील महायुतीत असेलेल्या पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. काल मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक झाल्याची माहिती आहे. यात अजित पवारांनी (Ajit Pawar) महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची बातमी ‘द हिंदू’ दिली आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील बोलताना म्हणाले, मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील. त्यांची मागणी करावी अशी पोजिशन आहे असं ही मला वाटत नाही. निवडणुकीपूर्वी अशी मागणी ते करतील असे मला वाटत नाही. ही बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवली असेल. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे तिथे अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यावर जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या आघाडीबाबत मी बोलणे योग्य नाही. कृती होण्याअगोदर बोलणे योग्य नाही.
अजितदादा फक्त ‘या’ व्यक्तीचं ऐकतात
शरद पवारांना सोडून चूक झाल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) स्वतःहून सांगितलं आहे. सध्याचे अजित पवार (Ajit Pawar) हे अरोरा नावाचे कन्सल्टंट सांगतील तसं बोलतात. अरोरा या कन्सल्टंट कंपनीने अजित पवारांचा मूळ स्वभाव दाखवण्यास पूर्ण बंदी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यासारखे बोलत नाहीत. अरोरा नावाचा कन्स्लटन्ट सांगतो तसेचं अजित पवार बोलतात. सल्लागार सांगतात तसे बोलतात. सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे अरोराने दादांमध्ये केलेलं परिवर्तन आहे, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.
अमित शाह-अजित पवारांची विमानतळावर भेट
देशाचे गृहमंत्री अमित शाह काल मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी अजित पवार गैरहजर असल्याने अनेक चर्चांना उधाण आले, मात्र, नंतर अमित शाह परत जाण्याआधी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
अजित पवारांची 60 जागांची मागणी
महायुतीत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा लढवायच्या आहेत. शिंदे गटाला 60 तर अजित पवार गटाला 50 जागा देण्याची प्राथमिक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी 80 जागा लढविण्याची तयारी करण्याचे आवाहन केले होते. पण नागपूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी किमान 60 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता महायुतीतील पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार याकडे राज्याचं लक्ष्य लागलं आहे.