(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित दादांना देवेंद्र फडणवीसांची सवय लागली, लंकेंच्या सभेत रोहित पवारांची बॅटींग, साताऱ्याचंही सांगितलं
दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मतदारसंघात आले होते. लोकांचा उत्साह पाहून ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्याचं दिसून येत आहे.
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांच्या प्रचाराची चौथ्या टप्प्यातील तोफ आज थंडावली. चौथ्या टप्प्यात मुख्यत्वे मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे, पुणे, नगरसह आज मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आल्याचं दिसून आलं. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शरद पवार मैदानात उतरले होते. दुसरीकडे निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये सभा घेतली. तत्पूर्वी, अजित पवारांनी शुक्रवारी सुजय विखेंसाठी प्रचारसभा घेत निलेश लंकेना चांगलाच दम भरला होता. आता, रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मतदारसंघात आले होते. लोकांचा उत्साह पाहून ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, कितीही पैशाचा वापर केला वापर केला तरी विजय हा सत्याचा होतो. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, म्हणून निलेश लंके हेच शंभर टक्के खासदार होणार असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या एक मोठ्या नेत्याची सभा होती. मात्र, लोकं न जमल्यामुळे ती सभा कॅन्सल करण्यात आली. तर मोदी एका राज्यात 40 सभा घेणार असतील तर त्याच्यावरून समजून घ्,या त्यांची परिस्थिती काय आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या तरी दहा वर्षात त्यांनी सामान्य लोकांसाठी काहीही केलं नाही. त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे भाजपला हद्दपार करायचे, असे रोहित यांनी म्हटले.
अजित पवार फडणवीसांसारखे वागायले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल पारनेरमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिले. अजित दादांचे भाषण हे आश्चर्यकारक असल्याचे म्हणत त्यांना देवेंद्र फडणवीसांची सवय लागली आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणीस यांना अहंकार, मीपणा आहे. सध्याचे अजित दादांचे भाषण देखील त्याच पद्धतीचं असल्याचं रोहित यांनी म्हटलं. म्हणजे, एकप्रकारे अजित पवारांना अहंकार चढला असून मीपणा असल्याचे रोहित यांनी सूचवले.
पुणे जिल्हा डीसीसी बँकेबाबत बोलताना, एका छोट्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे. सीसीटीव्ही बघावा लागेल, सीसीटीव्हीमध्ये पैसे वाटतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे आहेत. हा विषय छोट्या अधिकाऱ्या राहणार नाही, पण वरपर्यंत हा विषय जात नसेल तर आम्ही घेऊन जाऊ. सामान्य शेतकऱ्यांच्या बँकेचा वापर जर व्यक्तिगत स्वार्थासाठी, हितासाठी होत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
फडणवीसांना मोदींवर विश्वास नाही
नरेंद्र मोदी खोटं बोलायला लागले, असं देवेंद्र फडणवीस यांचे मत असावं. एका बाजूला भाषणामध्ये नरेंद्र मोदी ऑफर देताय आणि देवेंद्र फडणवीस नाही म्हणत आहेत. तर देवेंद्र फडणीस यांचा मोदींवर विश्वास राहिला नसेल, असे म्हणत मोदींनी दिलेल्या ऑफरवरील फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर रोहित यांनी भाष्य केलं.
लोकं भाजपला नाकारत आहेत
पंकजा मुंडे यांच्या सभेत उदयनराजें भावूक झाले,यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. माझ्या रडण्याचे कारण म्हणजे मी भावनिक झालो, साहेबांनी सांगितलेली गोष्ट मला आठवली तेव्हा माझे मन भावनिक झाले. तर आज उदयनराजे भावनिक झाले होते, साताऱ्यात देखील लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. त्यामुळे त्यांना देखील अंदाज आला असावा या निवडणुकीत निकाल काय लागेल. ते का भावुक झाले हे मला सांगता येणार नाही. मात्र, जे भाजपासोबत गेले त्यांची परिस्थिती फार वेगळी असून लोक त्यांना नाकारत आहेत, असे रोहित यांनी म्हटले. ईडीची कारवाई झाली तेव्हा अजित दादांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यामुळे, ते पाणी नव्हतं आणि आज तुम्ही नाटक करताय ही दुटप्पी भूमिका आपल्याला कळते,असेही रोहित यांनी म्हटले.