Anna Bansode: शिंदे गटाची एका राज्यमंत्रीपदावर बोळवण, अजित पवारांना काहीच नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने मनातील खदखद बाहेर काढली
Maharashtra Politics: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळवाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळाले नाही. यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अण्णा बनसोडे यांनी या नाराजीला मोकळी वाट करुन दिली
पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) पंतप्रधानांचा आणि मंत्र्यांचा शपथविधी रविवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी एकूण 72 खासदारांना मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील केवळ सहा मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मोठी राजकीय जोखीम पत्कारुन भाजपसोबत आलेल्या अजित पवार गटाला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. अजित पवार गटाचा (Ajit Pawar Camp) एकच खासदार असल्याने त्यांना फक्त राज्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दाखवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने कालच्या शपथविधी सोहळ्यात फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली होती. या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या नाराजीला मोकळी वाट करुन दिली आहे. ते सोमवारी पिंपरीत 'एबीपी माझा'शी बोलत होते.
एनडीए सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाने ही अन्याय झाल्याची खदखद बोलून दाखवली आहे. सरकार स्थापन होऊन 24 तास उलटायच्या आतच मंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरू झालेलं आहे. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय, असे अण्णा बनसोडे यांनी म्हटले.
मागील काळापासून आपण बघितलं असेल की, आदरणीय दादांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला. वास्तविक त्यांनी एवढा मोठा विरोध पत्कारून भाजपसोबत गेले. खरंतर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळ्याची कल्पना होती. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 4 सीट दिल्या, त्यापैकी सुनील तटकरे यांची एक सीट निवडून आली, तर प्रुफल पटेल हे अगोदरच राज्यसभेवर खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजितदादा गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळायला पाहिजे होते; अण्णा बनसोडे
प्रफुल पटेल आणि अजित पवार यांचे म्हणणे होते की, राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद हवे. पण भाजपकडून राज्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी राज्यमंत्रीपद न घेता आपण थोडावेळ थांबू, अशी भूमिका घेतली.
विधानसभा निवडणुका पाहून तरी कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होते: बनसोडे
महाराष्ट्रात शिंदे गटाचे 7 खासदार आहेत, त्यांनाही एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळायला हवे होते. पण त्यांना फक्त एक राज्यमंत्रीपद देण्यात आले. अजितदादांना एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. महाराष्ट्रातील हे दोन्ही दिग्गज आणि प्रभावी नेते गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत काम करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून दोन्ही पक्षांना कॅबिनेट मंत्रीपदं द्यायला पाहिजे होती. इतर राज्यात एक खासदार असणाऱ्या पक्षालाही एक मंत्रीपद देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तरी महाराष्ट्राला मंत्रिमंडळ वाटपात झुकते माप द्यायला पाहिजे होते, असे वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील ह्या 6 मंत्र्यांनी घेतली शपथ
नितीन गडकरी - कॅबिनेट
पियुष गोयल - कॅबिनेट
प्रतापराव जाधव - राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
रामदास आठवले - राज्यमंत्री
रक्षा खडसे - राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - राज्यमंत्री
आणखी वाचा