Ajit Pawar: मोठी बातमी : बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती : अजित पवार
Maharashtra Politics: बारामती लोकसभेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुप्रिया सुळे यांचा पराभव केला होता. रक्षाबंधनाला राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे जाणार का?
मुंबई: राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाने प्रसिद्धी आणि प्रचाराच्या बाबतीत कात टाकल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमासंवर्धनासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीने सल्ला दिल्यानुसार अजित पवार गटाकडून सध्या राज्यातील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठी अजित पवारांकडून सुरु असलेले पिंक पॉलिटिक्स चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार आता सार्वजनिक व्यासपीठावर फक्त गुलाबी जॅकेट परिधान करत आहेत. जनसन्मान यात्रेतील त्यांच्या सर्व गाड्या गुलाबी रंगाने रंगवण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी कालच धुळ्यात शेतावरील बांधावर जाऊन त्याठिकाणी काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला होता. एकूणच अजित पवार यांच्याकडून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बायकोला रिंगणात उतरवणे, ही चूक होती, ही अजित पवार यांची कबुली अजितदादांच्या प्रतिमासंवर्धनासाठी वापरण्यात आलेल्या रणनीतीचाच एक भाग आहे का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
View this post on Instagram
आणखी वाचा
पक्ष सोडला नसता तर अजितदादा यावेळी मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचा चिमटा