Sattar vs Danve : ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे, सत्तारांचा अंबादास दानवेंवर पलटवार
"आमदार वाणीसाहेब असते तर खोके घेणाऱ्यांना बुटाने मारलं असतं", असं अंबादास दानवे वैजापूरच्या सभेत म्हणाले होते. त्याला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं. "ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे," असं सत्तार म्हणाले.
Sattar vs Danve : "ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे," अशा शब्दात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर हल्लाबोल केला. ते अहमदनगरमधील (Ahmednagar) राहुरीत बोलत होते. "आमदार वाणीसाहेब असते तर खोके घेणाऱ्यांना बुटाने मारलं असतं", असं अंबादास दानवे वैजापूरच्या सभेत म्हणाले होते. त्याला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं.
अब्दुल सत्तार म्हणाले, "ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच मारलं पाहिजे. त्यांना दोन बायका करण्याचा अधिकार हिंदू धर्माने दिलाय का? जर अधिकार असेल तर मारु नका, नसेल तर त्यांना जरुर मारा. विधानपरिषदेच्या शपथपत्रात त्यांनी दोन बायका असल्याचं लिहून दिलं आहे"
राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांची उपस्थिती होती. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ऑनलाईन हजर होते.
मुख्यमंत्र्यांवर कार्यकर्त्यांचा विश्वास
दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. अनेक पक्षातील लोक त्यांच्या कामावर खुश आहेत. एकनाथ शिंदे हे गतिमान सरकार चालवत आहेत. जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध असलेले अशी त्यांची ओळख आहे. त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातील अनेक पक्षातील लोक येण्यास तयार आहेत. राजकीय परिवर्तनासाठी भविष्यात अनेक लोक शिंदे गटात येतील"
आगामी सर्व निवडणुका भाजप-शिंदे गट जिंकणार असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
शिवसेना नितीमत्ता विसरली
"जशाजशा निवडणुका जवळ येतील तसं हजारोंच्या संख्येने लोक शिंदे गटात प्रवेश करतील. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते सत्य बोलल्या आहेत. मला त्याचं राजकारण करायचं नाही. मात्र ठाकरे गटातील ज्येष्ठ नेतेच बोलत आहेत. शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्यकर्ता, नेता नाराज आहे. काम करण्याच्या पद्धतीमुळे नाराज आहेत. शिवसेना आपली नितीमत्ता विसरलीय. ज्या पक्षाशी जीवनभर लढले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. मी काँग्रेस सोडून इकडे आलो. एकनाथ शिंदेंनी सामान्य माणसाला ताकद देण्याचे हे परिणाम आहेत," असं अब्दुल सत्तार म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार बुटाने मारण्याच्या लायकीचे : अंबादास दानवे
शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी आज असते तर शिंदे गटाच्या आमदारांना बुटाने मारले असते आणि हीच लायकी राहिली आहे आणि राहणार आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं होतं. वैजापूरचे माजी आमदार दिवंगत आर एम वाणी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळी अंबादास दानवे बोलत होते. पूर्वी ग्रामपंचायतीला कवडी देत नव्हते, आता लाख-लाख, दोन दोन लाख देऊ लागलेत, म्हणून खोके हे खरेच आहे, खोटे थोडेच आहे. ज्या गोष्टी सत्य आहेत, त्या जनतेसमोर आल्या पाहिजेत. आज वाणी साहेब असते तर बुटाने मारलं असतं, असं अंबादास दानवे म्हणाले होते.
VIDEO : Abdul Sattar on Ambadas Danve: अंबादास दानवेंच्या प्रतिज्ञापत्रात दोन बायकांचा उल्लेख