Aaditya Thackery: किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंची राणेंना ठस्सन, 'जय शिवाजी, जय भवानी'ची घोषणा, शिवसैनिकांना स्फुरण चढलं
Sindhudurg news: ठाकरेंच्या कट्टर मावळ्यांनी आदित्य ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली, एकजणही मागे हटला नाही. वैभव नाईक, राजन साळवी, विनायक राऊत, अंबादास दानवे शेवटपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत उभे राहिले. राजकोट किल्ल्यावर राडा
सिंधुदुर्ग: राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे आणि राणे पितापुत्रांमुळे याठिकाणी जोरदार राडा पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते बाहेरचे आहे, ते किल्ल्यावर पाहणी करायला कशाला आले, असा आक्षेप नारायण राणे यांनी घेतला. त्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे आदित्य ठाकरे आणि मविआच्या नेत्यांना किल्ल्यातून बाहेर काढा, यासाठी हट्टाला पेटले. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही 'अरे ला कारे' करत मागे हटायला नकार दिल्यामुळे राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यासाठी किल्ल्याचे चिरे उखडून फेकण्याचा प्रकारही घडला. राणे समर्थक आणि ठाकरे गटाने एकमेकांच्या नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव किल्ल्यावर असल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर केली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात असताना त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमछाक होताना दिसली.
किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंची घोषणाबाजी
बराच काळ दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मागे हटत नाहीत, हे लक्षात आल्यावर राजकोट किल्ल्याच्या परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. यानंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राणे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाच्या नेत्यांची समजूत काढली. सुरुवातीला आदित्य ठाकरेंना किल्ल्याबाहेर जाऊन देणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या निलेश राणे आणि नारायण राणे यांनी आदित्य यांना किल्ल्याबाहेर जाण्यास वाट दिली. आदित्य ठाकरे यांनीही सामोपचाराची भूमिका घेत एक पाऊल मागे घेत राजकोट किल्ल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरे हे जेव्हा निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांसमोर आले तेव्हा आदित्य यांनी अचानक जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. 'जय भवानी, जय शिवाजी', 'हर हर महादेव' अशा घोषणा आदित्य ठाकरे यांनी दिल्या. त्यामुळे शिवसैनिकांच्या अंगातही जोश संचारला आणि त्यांनीही राणे समर्थकांच्या दिशेने पाहत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.
ठाकरेंच्या कट्टर मावळ्यांनी आदित्य ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली
हा संपूर्ण राडा सुरु असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसह किल्ल्याच्या आतमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा होता त्याठिकाणी शांतपणे बसून होते. ते इतर नेत्यांशी गप्पाही मारत होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे समर्थकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. तर विनायक राऊत, राजन साळवी, अंबादास दानवे हे ठाकरेंचे कट्टर शिलेदारही शेवटपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत उभे राहिले. शरद पवार गटाचे जयंत पाटीलही यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. वाद वाढल्यानंतर जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्याशी बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकरे गटाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते समोर राणे समर्थक दिसल्यामुळे माघार घ्यायला तयार नव्हते.
आणखी वाचा