Aaditya Thackeray Jalgaon Visit : बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व का?
Aaditya Thackeray Jalgaon Visit : आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.
Aaditya Thackeray Jalgaon Visit : शिवसेना (Shiv Sena) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज (20 ऑगस्ट) जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे पक्षात फूट पडली. त्यानंतर आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. परिणामी त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया जळगावातील असलेले बंडखोर आमदार, ज्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेची सभा होणार आहे.
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील
कट्टर शिवसैनिक तसेच शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी गुलाबराव पाटील यांची ओळख होती. जळगाव ग्रामीण मतदारसंघात 1999 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीत 2009 ची निवडणूक वगळता सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. पान टपरीपासून मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. शिवसेनेत घट्ट पकड मजबूत झाल्यावर गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत.
आमदार किशोर पाटील
पाचोरा तालुक्याचे दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील हे कट्टर शिवसैनिक होते. आर ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका होते. आ.ओ. पाटील यांच्यामुळे आमदार किशोर पाटील हे राजकारणात आले. पाचोरा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून ते मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
आमदार चिमणराव पाटील
पारोळा येथील रहिवासी चिमणराव पाटील हे कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे काम करत होते. दोन वेळा ते पारोळा एरंडोल या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दूध संघावर ते गेल्या वर्षापासून संचालक आहेत. त्यांनीही नुकताच शिंदे गटात प्रवेश केला असून ते सुद्धा मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
या तीनही आमदारांची त्या त्या मतदारसंघात कट्टर शिवसैनिक ओळख असून त्याठिकाणी प्रत्येकाचा चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळे या बंडखोरांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा. तसंच या ठिकाणचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची तयारी
आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे पाचोरा तालुक्यातील सामनेर या गावापासून ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे तर पाचोरा शहरात सुद्धा अनोख्या पद्धतीने शिवसैनिकांची उपस्थिती राहणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितलं. जिल्ह्यात पहिली सभा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा या ठिकाणी होणार आहे.
संबंधित बातम्या