Video: मनसे म्हणते, वरळीत तुम्हाला हरवणार, आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले आधी शर्ट घालून यायला सांगा!
उद्धव ठाकरेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील भाषणावर मनसेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या प्रमुख तीन पक्षांसोबत एकत्र येत मनसेनंही (MNS) साथ दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी, मी माझ्या चिन्हाशी कुठलीही तडजोड करणार नाही, एक देता का दोन देता.. असलं मला जमत नाही, असे म्हणत केवळ नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यावरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरेंवर टीकाही केली होती. मात्र, शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतानाही उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. केवळ मला विरोध करायचा म्हणून एकाने बिन'शर्ट' पाठिंबा दिल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होता. त्यावरुन, आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला आहे. कारण, अमित ठाकरेंच्या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील भाषणावर मनसेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. मनसेच नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे यांचा 'बिनशर्ट पाठिंबा' हा विनोद कळायला मला 10 मिनिटं लागली. इकडे वरळीत राज साहेबांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का? ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकांवेळी वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. आपला उमेदवार न देता आदित्य ठाकरेंसाठी पाठिंबा जाहीर करत नातेसंबंध जपले होते. आता, अमित ठाकरेंनी हीच आठवण शिवसेना ठाकरेंना करुन दिली. त्यावरुन, आता आदित्य ठाकरेंनीही मनसेवर पलटवार केला आहे.
यावेळी, आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मनसेही वरळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी करत आहे, यंदा वरळी विधानसभा मतदारसंघात तुमचा पराभव होणार असल्याचा दावाही मनसेने केला आहे, असा प्रश्न आदित्य यांना विचारला असता, आदित्य यांनी बिनशर्त टीकेच्या अनुषंगानेच पलटवार केला. त्यांना सांगा, शर्ट घालून या, असे आदित्य यांनी म्हटले. दरम्यान, मनसे पक्षाने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनांच्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी मनसेनवर जोरदार टीका केली. सुपारीबाज पक्षांबद्दल मी काही बोलत नाही, निवडणुका आल्या की ते पब्लिसिटी स्टंट करत असतात, असेही आदित्य यांनी म्हटले. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधुतील हा संघर्ष अधिक गडद होणार का काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
आदित्य ठाकरेंना यासाठी पाठिंबा दिला नव्हता
अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कामगिरीवरही भाष्य केले आहे. आता, शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही होणार नाही. एका आमदाराला पाच वर्षे मिळतात. कोरोनापासून वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरताना दिसले नाहीत. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता. वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्यासंदर्भात काय बोलणी झाली असतील तर ती मला माहिती नाहीत, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.