(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Working Committee : काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत, वर्किंग कमिटीचे सदस्यही निवडणुकीने नेमले जाणार?
Congress Working Committee : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता संघटनात्मक पातळीवरही मोठे बदल होणार का, वर्किंग कमिटीवरचे सदस्य पण निवडणुकीने नेमले जाणार का याची उत्सुकता आहे. त्यासंदर्भातही आज मोठे संकेत नव्या अध्यक्षांनी दिले आहेत.
Congress Working Committee : काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सूत्रं तब्बल 24 वर्षानंतर गांधी घराण्याच्या बाहेर हस्तांतरित झाली. अध्यक्षपदावर निवड झाल्याचं अधिकृत पत्र पक्षाचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना सोपवलं. दिल्लीतल्या काँग्रस मुख्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. भार हलका झाला, अशी भावना व्यक्त करत सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात खर्गे पक्षाला उभारी देतील, असा विश्वास व्यक्त केला.
1998 पासून काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी सांभाळत आहेत. 2017 नंतरचं दीड वर्षाचं राहुल गांधींचं अध्यक्षपद सोडलं तर जवळपास 24 वर्षे त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. आज अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताना मल्लिकार्जुन खर्गेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्याआधी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शनही घेतलं.
काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत बदलाचे संकेत
अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यानंतर आता लवकरच काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेतही बदलांचे संकेत आहेत. आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांनी, काँग्रेस महासचिव, प्रभारींनी आपापले राजीनामे मल्लिकार्जुन खर्गेंना सादर केले आहेत.
गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक?
अध्यक्षपदासाठी जशी निवडणूक झाली तशीच काँग्रेस वर्किंग कमिटीसाठीही निवडणूक व्हावी, ही G-23 गटाचीही मागणी होती. एकूण 25 सदस्यांपैकी 12 सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडले जातात. काँग्रेस पक्षासासाठी निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती आहे. त्यामुळे गुजरात निवडणूक संपल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीच्याही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस पक्षाची कार्यशैली बदलणार का?
अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता लगेच पुढची परीक्षा हिमाचल, गुजरातमध्ये होत आहे. त्या दृष्टीने किती सक्रीय प्रचार आता नवे अध्यक्ष करत आहेत हेही कळेल. अध्यक्ष तर बदलला तर त्यामुळे काँग्रेस पक्षाची कार्यशैली बदलणार का, याची उत्सुकता असेल.