अहमदनगरमध्ये मोठा ट्विस्ट, सेनापती विखेंकडे पण सैन्य लंकेच्या पाठीशी; ठाकरेंचा दबदबा कायम
मविआतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी काल उशिरा भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पाठींबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि राजकिय चर्चांना उधाण आलं.
अहमदनगर : महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar) मतदार संघामध्ये पारनेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार, माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय भास्करराव औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पाठींबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि एकच राजकीय खळबळ उडाली. विजय औटी यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना त्यांच्याच पारनेर मतदारसंघातून धक्का देण्याची ही सुजय विखेंची खेळी असल्याची चर्चा रंगत असताना आता पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मविआ सोबतच असल्याचे स्पष्ट केल्याने निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखेंची खेळी परतवून लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, सेनापती गेला पण सैन्य लंकेंसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मविआतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी काल उशिरा भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पाठींबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि राजकिय चर्चांना उधाण आलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी विजय औटी यांच्याविरोधात निवडणूक लढवल्यानेच त्यांनी असा निर्णय घेतला असावा असं वाटतं असलं तरी मधल्या काळात बाजार समितीच्या निवडणूकीत विजय औटी आणि निलेश लंके यांनी जुळवून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. मग तरीही मविआमध्ये एकत्र असताना लोकसभा निवडणुकीत औटीनी आपली भूमिका बदलल्याने ही सुजय विखेंचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे. तर सुजय विखेंनी देखील यावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
4 जूनला उत्तर मिळेल
गेल्या एक वर्षापासून पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे शोषण झाले आहे. गोरगरीब जनता आणि नेत्यांना प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला आहे. जेव्हा 4 जूनला निकाल लागेल, त्या दिवशी पारनेर तालुक्याचे मतदान पाहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर असेल असे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर सुजय विखेंनी केलेली खेळी परतवून लावण्यासाठी निलेश लंके यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले. पारनेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक बैठक नगर शहरात पार पडली. त्यामध्ये माजी आमदार औटी यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याच जाहीर करण्यात आलं.
औटींची भूमिका व्यक्तिगत
सुजय विखेंना पाठींबा देण्यासाठी विजय औटी यांनी घेतलेल्या बैठकीत पारनेर शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे,युवा सेना -अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारे हे उपस्थित होते. त्याच पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण मविआ म्हणजेच निलेश लंके यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान निलेश लंके यांच्यासोबतच असल्याचे सांगताना निलेश लंके यांच्याकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी अन्याय झाल्याचेही त्यांनी बोलवून दाखवले. भविष्यात लंके यांच्याकडून किंवा त्यांच्या पदाधिकऱ्यांकडून शिवसैनिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची ग्वाही देण्यात आल्याचे पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी म्हंटले आहे. तर सुजय विखेंना पाठींबा देण्याची भूमिका एकट्या विजय औटी यांची असून महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नसल्याची प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी दिली आहे.
औटींच्या भूमिकेचा कोणाला फायदा?
खरंतर विजय औटी आणि निलेश लंके यांच्यातील संघर्ष 2019 पासून संपूर्ण जिल्ह्याने बघितला आहे. विजय औटी हे शिवसेनेचे आमदार असतांना निलेश लंके हे पारनेर शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे दोघांनी नेहमी एकमेकांना प्रतिस्पर्धीच्या रूपात पाहिले आणि घडले ही तसेच. एकमेकाविरोधात दंड थोपटणाऱ्या लंके आणि औटीनी एकमेकाविरोधात 2019 ची विधानसभा देखील लढविली त्यात औटी यांचा पराभव झाला होता. त्यावेळी सुरू झालेल्या या दोघांमधील संघर्षाचा फायदा सुजय विखेंनी घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेतून विखेंना औटी यांचा फायदा होणार का?, पारनेर तालुक्यातील इतर शिवसैनिक नेमकी कुणाच्या मागे उभे राहणार? विजय औटी यांच्यावर पक्ष काही कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे.