एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिर्डीत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय? तपास करा, हायकोर्टाचे आदेश
र्डीत साल 2017 मध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला, पुरूष असे मिळून थोडे थोडके नव्हे तर तब्बल 88 जण बेपत्ता झाले आहेत. यामागे एखादं मानवी तस्करीचं किंवा मानवी अवयवांची तस्करी करणारं एखादं रॅकेट तर अस्तित्त्वात नाही ना?, अशी शंका व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.
![शिर्डीत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय? तपास करा, हायकोर्टाचे आदेश Petition at high court aurangabad bench over missing people from Shirdi temple area शिर्डीत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय? तपास करा, हायकोर्टाचे आदेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/14180258/shirdi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रासह देशातील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणजे साईबाबांचं शिर्डी. दरवर्षी इथं करोडो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात. मात्र इथं येणारा प्रत्येकजण घरी परत जातो का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं किंवा वृद्ध काय पण कधी कधी प्रौढ, समंजस व्यक्तीही हरवतात. मात्र शिर्डीत साल 2017 मध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला, पुरूष असे मिळून थोडे थोडके नव्हे तर तब्बल 88 जण बेपत्ता झाले आहेत. यामागे एखादं मानवी तस्करीचं किंवा मानवी अवयवांची तस्करी करणारं एखादं रॅकेट तर अस्तित्त्वात नाही ना?, अशी शंका व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना विशेष पथकाची स्थापना करून सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील एक रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर नुकतीच या याचिकेवर सुनावणी पार पडली. तेव्हा हायकोर्टानं या बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून तपास आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये सोनी आपली पत्नी आणि दोन मुलांसह शिर्डीला आले होते. बाबांचं दर्शन झाल्यानंतर प्रसादालयाच्या वाटेवर त्यांची पत्नी अचानक बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्यानं सोनी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी तक्रारीबाबत वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा, परंतु त्यांना दाद मिळाली नाही. घटनेच्या वेळी प्रसादालयाजवळचे सीसीटीव्ही बंद असल्याचंही यावेळी आढळून आले.
शिर्डीत गायब होणाऱ्या लोकांबाबत जनजागृतीसाठी पोस्टर लावावेत, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपल्यासोबत असलेल्या माणसांची काळजी घेण्याचे आवाहन करावे, मंदिर परिसरातील सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, अशा सूचना हायकोर्टाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठात याचिकेवरील सुनावणीत नगर पोलिसांना निर्देश मिळाल्यानंतर आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. सर्व बेपत्ता व्यक्ती संदर्भात पोलिसांकडून माहिती मागवली जात आहेत. यापैकी अनेक व्यक्ती मिळाल्या असून आम्ही तपास करत असल्याच शिर्डी पोलिसांनी सांगितलं आहे. या तपासात कोणतीही मानव तस्करी अथवा मानवी अवयव तस्करी करण्याचा प्रकार नसल्याच शिर्डी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी दीपक आंधाले यांनी सांगितलं आहे.
शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सात्तत्याने वाढत आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्ती, भाविक यांच प्रमाणही वाढत आहे मात्र पोलिसांकडून हव्या त्या उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शिर्डी हे अत्यंत गर्दीचं ठिकाण असल्याने पोलिस बळ वाढवण्याची मागणी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)