(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News: रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी उडवले जैन मुनींना, परभणीच्या बोरी तांड्याजवळील घटना
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथे रिल्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिली आहे.
परभणी: हल्लीच्या काळात इन्स्टा रिल्स (Instagram Reels) बनवण्यात तरुणाई अक्षरश: हरवून गेलीय. असंच रिल्स बनवणं परभणीत काही तरुणांना चांगलच महागात पडलंय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथे रिल्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झालीय. हे चारही तरुण अल्पवयीन असून या चारही जणांविरोधात या मुनींनी तक्रार देण्यास नकार दिलाय. सध्या या दोन्ही मुनींची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेवरुन आजची तरुण पिढी रिल्सच्या विळख्यात किती अडकलीय हे पुन्हा एकदा पहायला मिळालं.
परभणीच्या बोरी येथून जिंतूरकडे जैन मुनी सौम्यसागरजी इतर मुनींसह जात होते. यावेळी बोरी तांड्याजवळ दोन दुचाकीवर चार युवक रिल्स बनवत असताना त्यांच्या गाडीने सौम्यसागरजी यांच्यासह त्यांचा सेवेकरी संकेत मोहारे यांना जोराची धडक दिली ज्यामध्ये दोघे ही गंभीर जखमी झाले. यावेळी भक्तांनी तात्काळ मदतीसाठी वाहन आणले. मात्र वाहनात बसण्यास जैन मुनींनी नम्रपणे नकार दिला. स्ट्रेचरवर सौम्यसागर मुनी यांना जिंतूरला नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यासह सेवेकरी संकेत मोहारे यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार रिल्स बनवणारे चारही तरूण अल्पवयीन आहे. त्यांच्या विरोधात तक्रार द्यायची नाही असा निर्णय जैन मुनी सौम्यसागरजी यांनी घेतला आहे. या घटनेमुळे मात्र पुन्हा एकदा या तरुणाई रिल्सच्या विळख्यात किती अडकली हे समोर आले आहे.
नाशिकमध्ये तरुणाला रील बनवणं पडलं महागात
इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची (Insta Reels) खूप क्रेझ आहे. अनेक तरुण-तरुणी इन्स्टा रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र काहीवेळा असंवेदनशील रील्स बनवणे महागात पडण्याची शक्यता असते. नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर हातात तलवार घेऊन स्वतःला दादा म्हणवून घेणं नाशिकमधील एका 19 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नाशिक शहरातील भारत नगरमध्ये राहणाऱ्या फैजान शेख या 19 वर्षीय युवकाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ पोस्ट करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तपासचक्रे फिरवली. दरम्यान हा व्हिडीओ बघताच गुन्हे शाखा एकच्या पथकाने फैजानसह त्याने तलवार खरेदी केलेल्या सचिन इंगोले या 28 वर्षीय तरुणालाही अटक केली. या दोघांकडून एक तलवार आणि एक लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे.