Parbhani : परभणीतही शिवसेनेला खिंडार, माधव कदम यांचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
Parbhani Shiv Sena : परभणीमध्येही शिवसेनाला खिंडार पडले आहे. पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधव कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केलाय.
Parbhani, Shiv Sena : आमदार आणि खासदारांनंतर आता नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. राज्यातील विविध शहरातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये परभणीच्या शिवसैनिकांची आज भर पडली आहे. पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधव कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केलाय.
परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठामपणे राहिल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी किंवा कार्यकर्ते शिंदे गटाकडे वळले नव्हते. मात्र आता परभणीतून ही शिवसेनेचे काही नेते एकनाथ शिंदे गटाकडे जात आहेत. पूर्णेतील शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती तथा गटनेते माधव कदम यांनी आपल्या समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखांच्या तालुक्यातच खिंडार पडले आहे. परभणीच्या पूर्णेतील शिवसेनेचे नेते माधवराव कदम यांनी काल पुर्णा तालुक्यातील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातून शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झालीय. माधव कदम यांच्यासह पालम, पूर्णा तालुक्यातील शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..
पूर्णा, पालम तालुक्यात माधव कदम यांचा प्रभाव -
पंचायत समितीचे माजी उपसभापती माधव कदम यांचा पूर्णा तसेच पालम तालुक्यातील अनेक गावांमध्ये मानणारा वर्ग आहे. त्यांच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याने शिवसेनेची इथली ताकत मात्र कमी होणार आहे.
विद्यमान जिल्हाप्रमुखांच्या तालुक्यातीलच शिवसेनिक शिंदे गटात -
परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील हे ठामपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याने जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यातून शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होणे टाळले. तरी शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या पूर्णा तालुक्यातूनच शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात जाण्यास सुरुवात झाली आहे.