(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News: 'मोदी हटावसाठी बैठक की राहुल गांधींच्या सोयरीकीसाठी?' रावसाहेब दानवेंचा विरोधकांच्या बैठकीवर हल्लाबोल
Parbhani News: परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
Parbhani News: पाटणामध्ये 23 जून रोजी पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवरुन (Oppostion Party Meeting) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधला. परभणीमध्ये (Parbhani) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे बोलत होते. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी उपस्थित होती. तर यावर बोलतांना रावसाहेब दानवे यांनी म्हटल की, 'त्यादिवशी 15 पक्ष मोदी हटाव म्हणून एकत्र आले आणि त्यांनी राहुल गांधींच्या लग्नाचा विषय काढला. त्यामुळे ती बैठक मोदी हटावची होती की राहुल गांधींच्या सोयरिकीची हेच कळालं नाही.' दरम्यान आज बोलतांना रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी लावलेल्या आणीबाणीच्या काळाला आज 48 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून परभणीमध्ये आणीबाणी विरोधी दिन साजरा करण्यात आला आहे. परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणीबाणी दिनाच्या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'राहुलच्या आजीनेच लोकशाहीतील काळाकुट्ट दिवस आणला आहे.'
या कार्यक्रमावेळी आणीबाणीच्या काळामध्ये शिक्षा भोगलेल्या जेष्ठ नागरिकांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच आणीबाणीच्या काळावर भाजपकडून तयार करण्यात आलेली चित्रफीत देखील दानवेंनी यावेळी पाहिली. तर आणीबाणीच्या काळात लोकांवर झालेल्या अत्याचारावरुन राहुल गांधी आणि काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, 'भारतात लोकशाही संपली म्हणून बाहेरील देशात राहुल गांधी ओरडत आहेत. पण ज्या दिवशी तुमच्या आजीने आणीबाणी लादली त्याच दिवशी लोकशाही संपली. तर राहुल गांधींनी त्यांच्या आजीने केलेल्या मुस्काटदाबीच्या घटना तपासाव्यात असा सल्ला देखील यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींना दिला आहे.'
दरम्यान यावेळी रावसाहेब दानवे यांनी केसीआर पक्षावर देखील भाष्य केलं आहे. सध्या केसीआर पक्षाकडून महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, 'एका एकरात तीळ लावलायला किती मेहनत लागते हे केसीआरला माहित आहे का?' दरम्यान या कार्यक्रमादरम्यान रावसाहेब दानवे यांनी अनेक मुद्यावर भाष्य करत विरोधकांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.