मराठा आरक्षणाचा दणका, परभणीतील पिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; एकाच जागेसाठी 155 अर्ज दाखल
Maratha Reservation : पिंपळगावातील गावकऱ्यांनी एका जागेसाठी तब्बल 155 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने विरोध केला होता.
परभणी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) वेगवेगळ्या पद्धतीने सर्वत्र आंदोलन सुरू आहेत. परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत होती. मात्र, आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतर निवडणूक हा पवित्रा घेत गावकऱ्यांनी तब्बल 155 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एका जागेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल दाखल झाल्याने निवडणूक आयोगची अडचण झाली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने ही ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे.
मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. तर, काही ठिकाणी आगामी निवडणुकांवर बहिष्कार देखील टाकण्यात आला आहे. तर, पिंपळगावातील गावकऱ्यांनी देखील एका जागेसाठी तब्बल 155 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने विरोध केला होता. मात्र, एका बॅलेट मशीनवर 14 उमेदवार असतात. अशा चार बॅलेट मशीन मतदान केंद्रावर लावू शकतो. मात्र, 155 उमेदवारांसाठी बॅलेट मशीन लावू शकत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक ही रद्द केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मधील निवडणुकीला मराठा आरक्षणाचा फटका बसणे सातत्याने सुरू आहे.
निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...
दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ज्यात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आयोगाच्या 28 मार्च 2007 च्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येत आहे. एका बॅलेट युनिटवर जास्तीत जास्त 14 उमेदवारांची मतपत्रिका बसविले जाते. त्यानुसार एका वेळेला जास्तीत जास्त चार बॅलेट युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ एकूण 60 उमेदवारांची मतपत्रिका सेट होऊ शकते. मात्र, याठिकाणी एका जागेसाठी 155 उमेदवारांची संख्या लक्षात घेता, ग्रामपंचायत चाटे पिंपळगाव (ता. पाथरी, जि. परभणी) मध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे निवडणूक घेता येणार नाही. तर, ग्रामपंचायत चाटे पिंपळगावमधील पोटनिवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पारंपारिक पध्दतीने राबविण्यासाठी पुरेशा प्रमाणात व मोठ्या मतपेटया उपलब्ध नसल्याने पोटनिवडणूकीची प्रक्रिया तुर्तास राबविता येणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा, विधानसभेतही गावकरी अर्ज दाखल करतील...
सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नसल्याने एकाच जागेसाठी 155 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुका आयोगाला ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी लागली. तर, आरक्षण देण्यास टाळाटाळ केल्यास पुढच्या लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांत अशाच पद्धतीने सर्व गावकरी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा इशाराही गावकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: