दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण आणि 22 एप्रिल रोजीचाच दिवस का निवडला याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याने (Terrorist) देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं, या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही गंभीर दखल घेत दहशवाद्यांना सोडणार नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी हल्लेखोरांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार असल्याचं म्हटलं. तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावही वाढला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून महाराष्ट्रातील 6 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताच्या समर्थनार्थ भूमिका घेत हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय सैन्य (Indian army) दल आणि सुरक्षा एजन्सींकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. एनआयएच्या प्राथमिक तपासातून आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी बैसरण परिसरातील 3 ठिकाणची रेकी केली होती. तसेच, 22 एप्रिल रोजीची तारीखही पर्यटकांची गर्दी पाहूनच निवडल्याचे समोर आले आहे.
दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण आणि 22 एप्रिल रोजीचाच दिवस का निवडला याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. 20 आणि 21 एप्रिल रोजी त्याठिकाणी मोठा पाऊस होता, पर्यटकांची संख्या कमी होती. त्यामुळे, तो कट रद्द करत त्यांनी पाऊस ओरल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढताच 22 एप्रिलची तारीख हा भ्याड हल्ला करण्यासाठी निवडल्याची माहिती तपास यंत्रणांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, एनआयएकडून पुढील तपास सुरू आहे. पहलगाम हल्ल्याच्या 8 दिवसांपूर्वी काश्मीरच्या पहलगाम परिसराची रेकी केली होती. बैसरण येथील अम्युझमेंट पार्कची रेकी करुन हल्ल्याचा प्लॅन त्यांनी आखला. या पार्कमध्ये गर्दी कमी असल्याने त्यांनी या पार्कमध्ये हल्ला करण्याचे टाळले. त्यानंतर, बैसरण घाटीतील पहगगामची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. अम्युझमेंट पार्कसह परिसरातील आणखी दोन जागांवर दहशतवाद्यांनी रेकी केली होती.
महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, पहलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारने पीडित कुटुंबीयांना 50 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. सरकार पूर्णपणे पाठिशी असल्याचा संदेश या निर्णयातून देण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे सुरक्षा एजन्सींकडून हल्लेखोरांचा तपास सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या बैठकाही सातत्याने होत आहेत. त्यामुळे, लवकरच भारताकडून जोरदार प्रत्त्युतर देत या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, अशी जनभावना दिसून येते.
























