Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील 'त्या' व्यक्तीची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये काय घडतंय?
Pahalgam Terror Attack: नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. यानंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय.

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं.
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय. आम्ही भारताला जसास तसं प्रत्युत्तर देऊ, अशी भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडे मदतीची याचना करत आहेत.
मुनीर यांना देशातल्याचं लोकांकडून धोका वाढला-
पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंतप्रधानांना इम्रान खान यांची मदत हवी आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात, तरी शाहबाज शरीफ यांच्याकडून मदतीची याचना करण्यात येत आहे. मुनीर यांचा विरोध कमी करावा असं शरीफ यांच्याकडून इम्रान खान यांना आवाहन करण्यात येत आहे. चार माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रान खानची मनधरणी सुरु केली आहे. इम्रान खाननं सिंधमधली आंदोलनं थांबवावी असं आवाहन देखील पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंतप्रधानाकडून केलं जातंय. इम्रान खाननं पुलवामा हल्ल्यानंतर आयएसआयच्या पदावरुन मुनीर यांना हटवलं होतं. लष्करप्रमुख होताच मुनीर यांनी इम्रान खान यांचा बदला घेतला होता. मुनीर यांच्यामुळंच इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मुनीर यांना देशातल्याचं लोकांकडून धोका वाढला आहे.
इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवून 14 वर्षांची शिक्षा-
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, इम्रान खान यांनी 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या राजकीय पक्षाची स्थापना केली. 2018 मध्ये ते पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिम राबवली आणि कल्याणकारी इस्लामिक राज्याच्या संकल्पनेवर भर दिला. मात्र, 2022 मध्ये त्यांना संसदेत अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात आले. 2023 मध्ये इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवून 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी या आरोपांना नाकारले असून, सैन्य आणि गुप्तचर संस्थांवर आपल्याला राजकारणातून दूर करण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या अटकेनंतर देशात मोठे आंदोलन झाले आणि त्यांचा सैन्याशी संघर्ष वाढला.




















