Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामागील सूत्रधार कोण? NIAचं पथक पोहचलं जम्मूत; तुरुंगातील दोन दहशतवाद्यांच्या साथीदारांची कसून चौकशी!
Jammu Kashmir Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिक तीव्र झाला असून आता या प्रकरणी NIAच्या पथकाने जम्मूतील कोट भालवाल तुरुंगाला भेट दिली असून दोन संशयितांची चौकशी केलीय.

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता तीव्र झाला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक आता जम्मूमध्ये पोहोचले आहे. एनआयएच्या पथकाने शुक्रवारी जम्मूतील कोट भालवाल तुरुंगाला भेट दिली. जिथे त्यांनी निसार अहमद आणि मुश्ताक हुसेन नावाच्या दोन संशयितांची चौकशी केलीय. 1 जानेवारी 2023 रोजी राजौरीतील डांगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मदत केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पीडितांना त्यांचा धर्म विचारून ठार मारले होते, ज्यामुळे देशभर संताप पसरला होता.
मुश्ताक अन् निसार यांची चौकशीसाठी पोहोचले NIAचे पथक
या हल्ल्यामागील कट रचणाऱ्यांची माहिती मिळावी म्हणून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मुश्ताक आणि निसार यांची चौकशी करण्यासाठी एनआयएची टीम आली आहे. तसेच यात स्थानिक मदतनीसांबद्दलही माहिती जाणून घेतलीय. जम्मूमध्ये पोहोचल्यानंतर, एनआयएच्या टीमने पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्दल आणि जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या इतर लपण्याच्या ठिकाणांबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुस्ताक आणि निसार यांची चौकशी केली. दरम्यान, येत्या काही दिवसांत एनआयए टीम इतर संशयीतांचीही चौकशी करू शकते आणि काहींना अटक देखील होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत
दुसरीकडे. पाकिस्तानने देखील संभाव्य युद्धाच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. या आठवड्यात पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याचे कळतंय. हे पाकचं चिथावणी देण्याचे एक केविलवाणा प्रयत्न असून ही भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मोहीम असल्याचं समजतं. विशेष सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तानने बेफिकीरपणे नौदलाचे इशारे दिले आहेत. अरबी समुद्रात सराव वाढवला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ही नियोजित क्षेपणास्त्र चाचणी ही उघड चिथावणी आहे आणि भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.
पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक
पहलगाम हल्ल्यानंतर, भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केले जात आहेत. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान, हानिया आमिर, सनम सईद आणि अली जफर यांचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या






















