Wardha Flood: 20 पेक्षा जास्त गावे 'नॉट रिचेबल', वर्धा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती
संततधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 20 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
वर्धाः वर्धा जिल्ह्यातील मुसळधार पाऊस रात्रभर सुरू असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीणभागातील पुलांवरुनही पाणी वाहू लागल्याने रस्तेही बंद आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीपर्यंत पोहोचू शकत नाही तर इतरही कामे खोळंबली आहे. गेल्या 2-3 दिवस जिल्ह्यात पावसाने काहीशी उघडीत दिली होती त्यामुळे नागरिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र परत रात्री बरसलेल्या मुसळधारमुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. ओसरत असलेल्या पूर परिस्थितीचा पाणी पुन्हा नागरिकांच्या घरात शिरायला लागला आहे.
पावसाच्या या दमदार हजेरीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते बंद झाल्यामुळे विद्यार्थी शेतकरी आणि व्यवसायाकांची वाट रस्त्यांमुळे अडलेली आहे. प्राप्त माहितीनुसार समुद्रपूर वर्धा मार्ग शेडगावजवळ बंद झाला आहे. तसेच समुद्रपूर वायगाव रस्ताही बंद झाला आहे. रेनकापूर नाल्याला पुर आल्यामुळे समुद्रपुर जाम मार्ग देखील बंद झाला आहे. या अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरातही पाणी घुसला असून पुर प्रभावीत गावाकडे पोहोचण्यात एनडीआरएफ पथकालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
20 पेक्षा जास्त गावे 'नॉट रिचेबल'
संततधार पाऊस गेल्या 12 तासापासून सुरु असल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले तुडुंब वाहत असल्याने 18 जुलै रोजी सकाळी जाम - समुद्रपूर, वडगाव-पिंपळगाव, साखरा-मंगरूळ, कोरा-नंदोरी, समुद्रपूर-वायगाव गोंड, सेवाग्राम-समुद्रपूर मार्ग बंद झाले आहे. वीस पेक्षा अधिक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.
विद्यूत पुरवठाही खंडीत
रात्रभर मुसळधार पाऊस बसला त्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती उद्भवत होती. अनेकांच्या घरी वृद्ध आणि चिमुकले असल्यामुळे त्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना चांगल्याच अडचणीचा सामना करावा लागला. बऱ्याच ठिकाणी झाडेही कोसळली आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
लाल नाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुराने प्रभावित होणाऱ्या जवळच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार समुद्रपूर तालुक्यात तालुक्यातील 24 तासात 168 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी प्रशासनाला आपत्तीकालीन माहिती पूरवावी असे आवाहन तहसीलदार राजू रणवीर यांनी केले आहे.