Devendra Fadnavis : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत; जवानांसोबत संवाद, नक्षलचळवळ संपवण्यासाठी मोठं पाऊल
Gadchiroli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मागासलेल्या आणि नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मागासलेल्या आणि नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहे. तर काही नव्या कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. गडचिरोलीच्या अतिदुर्गम गट्टा - वांगेतुरी भागात मुख्यमंत्री रस्त्याचे आणि नव्या पुलाचे लोकार्पण करणार असून या परिसरात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या बस सेवेचे ही उद्घाटन करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एका दुर्गम पोलीस मदत केंद्रावर गडचिरोली पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत संवादही साधणार आहे.
नक्षल चळवळ संपवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
दुपारी एक वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते कोनसरी येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उद्योग श्रेणीतील हा पहिलाच उद्योग मानला जात आहे. दुपारी चार वाजता गडचिरोली पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही अत्यंत वरिष्ठ माओवादी कमांडर कायद्या समोर शरणागती पत्करणार आहे. अत्यंत वरिष्ठ माओवाद्यांची पोलिसांसमोर ही शरणागती गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ संपवण्याच्या दिशेने एक मोठा पाऊल मानली जात आहे.
स्वातंत्र्यांनतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवा
2025 या नववर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीत सी-60 जवानांसोबत साजरा करणार आहेत. पेनगुंडा आऊटपोस्ट येथे ते जवानांसोबत ते आज संवाद साधतील. तसेच आजच्या जनजागरण मेळाव्यात गावकर्यांशीही संवाद साधतील. पेनगुंडा आऊटपोस्ट हे गडचिरोलीपासून 200 कि.मी. अंतरावर आहे. या दुर्गम भागात स्वातंत्र्यांनतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी एसटी बस सुरु होणार असून मुख्यमंत्री त्याचा शुभारंभ आज करणार आहे. तसेच लॉईड मेटल प्रकल्प, कोनसरीच्या पेलट प्लांटचे उदघाटन करणार आहे. प्रामुख्याने यावेळी कामगारांना, शरणागती पत्करलेल्या पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांना शेअर्स प्रदान करणार असून शाळा, रुग्णालय, पोलिस निवासस्थाने इत्यादींचे उदघाटन ही आज केलं जाणार आहे. ग्रीन मायनिंग प्रकल्पाचाही शुभारंभ होणार असून 6200 कोटींच्या गुंतवणुकीचे 4000 रोजगार देणारे प्रकल्प येथे साकारला जात आहे. त्यानंतर सी-60 जवानांचा मुख्यमंत्री सत्कार करणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे.
गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस?
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ही गडचिरोलीचा पालकत्व स्वीकारायला आवडेल, असे मत व्यक्त केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे, अशी स्थानिकांची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीचा दौरा करत गडचिरोलीच्या विकासकामांना गती देताना दिसत असल्याने तेच गडचिरोलीचे पालकमंत्री होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या