Nagpur Rains : सोमवारीही संततधार, पावसाचा जोर मात्र नरमला
विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असून त्यानंतर हळू हळू पावसाचा जोर कमी होणार आहे. शहरात सकाळच्यासुमारास रिमझिम पावसानंतर काही वेळाच्या विश्रांतीनगर पुन्हा पाऊस सुरु झाला.
नागपूरः गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने रविवारी दिवसभर उसंत घेतल्यानंतर रविवारी रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर नरमल्याचे दिसून आले. महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले.
विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असून त्यानंतर हळू हळू पावसाचा जोर कमी होणार आहे. शहरात सकाळच्यासुमारास रिमझिम पावसानंतर काही वेळाच्या विश्रांतीनगर पुन्हा पाऊस सुरु झाला. दिवसभर आभाळ भरुन होते. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसर जोरदार पाऊस बरसल्याने नागपुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते व चौक पुन्हा जलमय झाले होते. पाच आणि सहा जुलै वगळता नागपुरात 30 जूनपासून दररोज पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळून गेला आहे. शेतांमध्ये जागोजागी पाणी तुंबल्याने कामे रखडली आहेत. शिवाय अत्याधुनिक पावसामुळे पिकेही पिवळी पडू लागली आहे. पावसामुळे शहरवासीदेखील मेटाकुटीस आले आहेत. काही वस्त्यांमध्ये अजूनही तलाव साचले आहेत.
सरासरीपेक्षा 66 टक्के जास्त पाऊस
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये मंगळवारसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचे संकेत नसल्याचे हवामान खात्याच्या अहवालातून दिसून येत आहे.
अनेक वस्त्यांमध्ये पाणी
नागपुरात सिमेंट रस्ते निर्मितीनंतर शहरातील अनेक जुन्या वस्त्यांमध्ये पाऊस साचण्याचा प्रमाण वाढला आहे. तसेच मनपानेही पावसाळीपूर्व नियोजन गांभिर्याने घेतले नसल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहे. तर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मनपाच्या हेल्पलाइनवर फोनकरुनही समस्या सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. साचलेले पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पावसाळी नाल्यामध्येच खच भरलेल्या असल्याची स्थिती शहरात आहे. अनेक ठिकाणांवर तर चक्क पावसाळ्यात नाल्यातील कचरा काढण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.
विद्यूत टावरवर चार दिवसांपासून माकड अडकले
हिंगणा तालुक्यातील माहुरझरी परिसरातीस एका हाय टेंशनलाईन विद्यूत टावरवर चार माकड गेल्या गुरुवार ते शुक्रवारपासून अडकल्याची घटना पुढे आली आहे. टावरच्या खाली असलेल्या भागात गवत आणि पाला पाचोळा असल्याने ते खाऊन परत टावरवर चढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. माकडांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी टॉवररुन दोरीही बांधली तरी त्याचा उपयोग झाला नाही. शिवाय माकड खाली उतरल्यावर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना बघून माकड परत टावरवर चढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. टॉवरवर तीन ते चार माकड असल्याचे बोलले जात आहे.