'ठाकरे' आडनाव नसतं तर राज ठाकरे कुठेतरी संगीतकार असते, गुलाबराव पाटलांची टोकाची टीका
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील नाशिकला आले होते.
नाशिक : शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्याकडे फक्त ठाकरे आडनावाचं वलय आहे. ठाकरे हे आडनाव नसतं तर राज ठाकरे कुठेतरी संगीतकार झाले असते, अशी टोकाची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. नाशिक महापालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्त गुलाबराव पाटील नाशिकमध्ये बोलत होते.
ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. राज ठाकरे यांच्याकडे ठाकरे आडनाव नसतं, तर ते कुठेतरी संगीतकार झाले असते. मनसे आमच्याकडे लोणच्यालाही सापडत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि शिवसेनेमुळे एक पानवाला आज कॅबिनेट मंत्री झाला आहे. मनसे पक्ष राहिला कुठे? असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणाा साधला.
भाजप आमच्या झाडावर वाढलं आणि ते आता आमच्यावर टीका करत आहेत. आमचं पोरगं कितीही गोरं असलं तरी त्याला तुम्ही काळं म्हणता. तुमचं पोरगं कितीही काळं असाल तरीही त्याला तुम्ही गोरा म्हणणार. तुम्हाला पीडीपी, नितीशकुमार, रामविलास पासवान चालतात आणि आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आलो तर आमच्यावर टीका करता, अशी विचारणा गुलाबराव पाटलांनी केली.
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी मनसे आणि भाजपवर चौफेर टीका केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये पोटनिवडणुक लागली आहे. याठिकाणी मनसे, भाजप आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत आहे.