(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai House Fire | वसईत घरातल्या धुपाने पेट घेतला, घर पूर्णपणे जळून खाक
देवपूजेसाठी लावलेल्या धुपाने पेट घेतला आणि अग्नितांडवामुळे संपू्र्ण घराची राख झाली. मुंबईजवळच्या वसईतील एव्हरशाईन सिटी परिसरात ही घटना घडली.
वसई : घरातील देव्हाऱ्यात सकाळ-संध्याकाळी दिवा लावला जातो. तर कधी घरात धूपही पेटवतो. मात्र त्याबाबत खबरदारी नाही घेतली तर किती मोठं संकट ओढावू शकतो याची प्रचिती वसईत आली आहे. प्रार्थनेच्या खोलीत धूप पेटवल्यानंतर धुपाने पेट घेतला आणि संपूर्ण घर जळून खाक झालं.
वसईच्या एव्हरशाईन सिटी परिसरातील स्टार रेसिडेन्सीमधील सातव्या मजल्यावर राहणाऱ्या हुसैन घनीवाला यांच्या घरी गुरुवारी (11 फेब्रुवारी) संध्याकाळी ही घटना घडली. या आगीत त्यांचं घर पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवाने यात त्यांच्या कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही अथवा कोणी भाजलं नाही. परंतु घरातील पाळीव पक्षी पोपटाचा धुरामुळे मृत्यू झाला.
घनीवाला कुटुंब त्यांच्या घरातील प्रार्थना खोलीत दररोज धूप आणि अगरबत्ती लावत होतं. परंतु गुरुवारी संध्याकाळी त्याच खोलीत धुपाने पेट घेतला आणि हळूहळू खोलीतील सामान जळून खाक झालं. यानंतर आग सर्व घरभर पसरली.
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. घनीवाला यांचं घर ड्युप्लेक्स होतं. घरात वृद्ध व्यक्ती तसेच मांजरीही होत्या. आग लागल्याचं समजताच शेजाऱ्यांनी घरातील सदस्यांना तसेच प्राण्यांना बाहेर काढलं. मात्र पिंजऱ्यातील पोपटाने धुराने गुदमरुन प्राण सोडले. घरात पेटवलेल्या धुपाने आग लागली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली आहे.
दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, घराचं मोठं नुकसान झालं आहे. घनीवाला यांनी नुकतंच घराचं रेनोव्हेशन केलं होतं. परंतु आगीमुळे सगळं वाया गेलं. त्यामुळे तुम्ही पण जर देव्हाऱ्यात धूप, अगरबत्ती लावत असला तर खबरदारी अवश्य घ्या.