मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहविभागाचे राज्य सरकारला आदेश
विदेशी नागरिकाशी कथित संबंध असल्यावरुन मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने राज्य सरकारला दिले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी याबाबत तक्रारी दिली होती.
मालेगाव : म्यानमारच्या नागरिकाशी कथित संबंध असल्यावरुन मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने राज्य सरकारला दिले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या तक्रारीवरुन हे आदेश देण्यात आले आहेत. म्यानमारमधील इक्बाल नावाचा व्यक्ती हा संशयित असून देश आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या वास्तव्याची चौकशी करण्याची मागणी आसिफ शेख यांनी केली होती.
म्यानमारमधील इक्बाल नावाचा व्यक्ती हा 7 डिसेंबर 2018 रोजी मालेगाव इथे आला होता. 14 डिसेंबरपर्यंत त्याचे मालेगाव शहरात वास्तव्य होते. इक्बाल हा मालेगावमध्ये एका विवाह समारंभासाठी आला होता. "इक्बाल हा संशयित व्यक्ती असून देश आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या वास्तव्याची चौकशी करावी," अशी मागणी कॉंग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली होती. इक्बाल ज्या खोलीत थांबला होता ती हॉटेलची रुम सुद्धा मालेगाव शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाने आरक्षित करण्यात आली होती. इक्बालने विवाह सोहळ्यात हजेरी लावल्यानंतर आमदार मौलाना मुफ्ती यांची भेट घेतली. इतकंच नाही तर इक्बालने आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासोबत परदेशातही भेट घेतल्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, अशा अनेक प्रश्न आसिफ शेख यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती.
माजी आमदार आसिफ शेख यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य शासनाला याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र संबंधित व्यक्ती ज्यांना भेटली ती व्यक्ती आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांकडे याची माहिती दिल्यानंतर मालेगाव पोलिसांना याची माहिती दिली.
आमदार मौलाना मुफ्ती यांचं स्पष्टीकरण माझ्याकडे चौकशीसाठी अजून विचारणा झालेली नाही. मुंबईत असताना विधानसभा अध्यक्षांनी बोलावून सांगितलं की केंद्राकडून चौकशी आल्याचं सांगितलं. यामध्ये म्हटलं होतं की, इक्बाल नावाची व्यक्ती जो बांगलादेशचा रहिवासी आहे. तो अतिरेकी आहे आणि तुमचे त्याच्याशी संबंध आहेत. काय तक्रारी आहे अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी फाईल मागवली. मी पाहिलं तेव्हा तक्रार देणारे हे माजी आमदार आसिफ शेख होते. त्यांनी 17 नोव्हेंबर 2019 आणि एप्रिल 2020 मध्ये तक्रार केली होती. इक्बाल दहशत पसरवणारा व्यक्ती असून तो मालेगावमध्ये राहिला होता. अजून खात्याकडून चौकशी आलेली नाही, असं मौलाना मुफ्ती यांनी सांगितलं.
"ज्या विवाह समारंभासाठी आला तिथे आपण उपस्थित नव्हतो, काही लोक त्याला माझ्याकडे भेटण्यासाठी घेऊन आल्याचं स्पष्टीकरण आमदार मौलाना मुफ्ती यांनी दिलं आहे. मात्र विदेशातील भेटीमधल्या फोटोबाबत विचारला असता ते म्हणाले की, "मी विदेशात जमातीच्या कामासाठी गेलो होतो. त्यावेळी अनेक जण भेटायला येत असतात आणि फोटो काढतात. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे."