एक्स्प्लोर
भाडेकरु निघाले दरोडेखोर, मालकासह एजंटवरही गुन्हा
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात काल अचानक पोलिस पथक दाखल झालं आणि त्यांनी पार्वती अपार्टमेंटमधून एका टोळीला ताब्यात घेतलं.

नाशिक : भाडेकरु ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र, अनेक घरमालक या नियमाकडे कानाडोळा करतात. पण ही घोडचूक घरमालकाला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात काल अचानक पोलिस पथक दाखल झालं आणि त्यांनी पार्वती अपार्टमेंटमधून एका टोळीला ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून कुख्यात दरोडेखोरांची टोळी भाडेकरु म्हणून पार्वती अपार्टमेंटमधल्या एका फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी तात्काळ या टोळीच्या मुसक्या आवळल्या. तसेच कुठल्याही माहितीशिवाय भाड्यानं घर देणारे रमेश सावंत आणि त्यांच्या एजंटवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाथर्डी फाट्यावरून ज्यांना अटक केली त्यात एक शार्प शूटरचाही समावेश आहे. कायद्यानुसार घरमालकानं भाडेकरुची सविस्तर माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरात अनेक घरमालक घरं भाड्यानं देण्याची जबाबदारी एजंटवर सोपवतात. कित्येकदा एजंटनं कुणाला भाड्यानं ठेवलं आहे याची घरमालकाला कल्पना देखील नसते. त्यामुळे आता घरमालकांनो वेळीच सावध होण्याची गरज आहे.
आणखी वाचा























