Pune News : मेट्रो की फुलराणी! पुणेकरांचा काही नेम नाही, पुणे मेट्रोमध्ये चक्क जादूगार रघुवीर यांच्या जादूचे प्रयोग
Pune Metro : मेट्रोला प्रतिसाद मिळावा यासाठी आज चक्क पुणे मेट्रोमधे जादूगार रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आलं होतं. जादूच्या या प्रयोगाला मात्र पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पुणे : पुणे (Pune News) तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आता पुणेकर नाही तर पुण्याची मेट्रो (Pune Metro) चर्चेत आली आहे.
पुणे मेट्रोला मेट्रो ट्रेन म्हणायचं की फुलराणी म्हणायचं असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. कारण मार्च महिन्यात पुणे मेट्रोचं पंतप्रधानाच्या (PM Modi) हस्ते उद्धघाटन झालं खरं पण मेट्रोच्या सर्व मार्गाचं काम अजूनही पूर्ण झालं नसल्याने मेट्रोला हवा तसा प्रतिसाद पुणेकरांकडून मिळत नाही. मेट्रोला प्रतिसाद मिळावा यासाठी आज चक्क पुणे मेट्रोमधे जादूगार रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आलं होतं. जादूच्या या प्रयोगाला मात्र पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पुणेकरांनी प्रवासासाठी मेट्रोची निवड करावी यासाठी पुण्यात आज मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं. याला मात्र पुणेकरांनी गर्दी केली होती. सहा मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. पण त्यानंतर पुणे मेट्रो प्रवासी वाहतुकीपेक्षा कधी झिम्मा - फुगडी तर कधी ढोल ताशे , कधी कवी संमेलन तर कधी फॅशन शो यासाठी चर्चेत राहिली . कारण उद्घाटन झालेलं असलं तरी पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी - चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गिकांच्या एकूण 33 किलोमीटर पैकी फक्त 18 किलोमीटरचे कामच पूर्ण झाले आहे . त्यामुळं पुणे मेट्रोचा प्रवास कर्वे रस्त्यावरील वनाझपासून सुरु होऊन कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयापर्यंत संपतो.
आज पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी पाहायला मिळते. ती कमी व्हावी यासाठी पुणे मेट्रोचा घाट घालण्यात आला. 2017 मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पण मागील पाच वर्षात ते पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यामुळं ज्यांना पुण्यातील एका भागातून दुसऱ्या भागात जायचं आहे त्यांना या मेट्रोचा अजूनही उपयोग करता येत नाही . त्यामुळं ही मेट्रो आहे की फुलराणी असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.